

नागपूर: नागपूर जिल्ह्यातील महायुतीसह समविचारी पक्षांची महत्वाची बैठक राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालय, गणेशपेठ येथे पार पडली. यावेळी आमची नेत्यांशी प्राथमिक चर्चा झाली असून येत्या 15 नोव्हेंबरपर्यंत भाजपने महायुती संदर्भात चित्र स्पष्ट करावे अन्यथा स्थानिक पातळीवर सर्व घटक पक्षांकडे आपले सक्षम उमेदवार ,यादी तयार आहे असा इशारा दिला गेला.
एकंदरीत स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत महाविकास आघाडी आणि महायुतीत स्वबळाच्या दृष्टीने सर्वच पक्षांची पडताळणी सध्या जोरात आहे. उमेदवारांना केवळ पाच दिवस प्रचारासाठी मिळणार आहेत. आगामी नगर परिषद व नगर पंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय रणनितीवर या बैठकीत चर्चा करण्यात आली. बैठकीला आमदार कृपाल तुमाने, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नागपूर जिल्हा निरीक्षक राजेंद्र जैन, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष प्रदेश महासचिव तानाजी वणवे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जिल्हाध्यक्ष राजाभाऊ टाकसाळे, भाजपा जिल्हाध्यक्ष आनंदराव राऊत, अजय बोढारे, शिवसेना जिल्हाध्यक्ष संदीप इटकेलवार, विनोद सातंगे, राष्ट्रवादी काँग्रेस नागपूर शहर जिल्हाध्यक्ष अनिल अहिरकर, राष्ट्रवादी शहर कार्याध्यक्ष श्रीकांत शिवणकर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष युवा अध्यक्ष अतुल खांडेकर, प्रदेश महासचिव बजरंग परिहार, भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष चेतन खडसे आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
महायुतीचा मोठा घटक पक्ष या नात्याने भाजपचा निर्णय लवकर न आल्यास दुसऱ्या बैठकीत पुढील धोरणात्मक दिशा ठरविली जाईल यावर घटक पक्षांच्या नेत्यांचे एकमत झाल्याची माहिती आहे.
जिल्ह्यात आपली शक्ती सिद्ध करण्यासाठी शिवसैनिक सज्ज!
आगामी नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने जिल्ह्यात आपली राजकीय मोर्चेबांधणी तीव्र केली आहे. नागपुरात महायुतीच्या सर्व घटक पक्षांची एक बैठक झाली. यावेळी 15 नोव्हेंबर पर्यंत चित्र स्पष्ट न झाल्यास सर्वच पक्षांकडे आपापले उमेदवार तयार आहेत असा इशारा आमदार कृपाल तुमाने यांनी दिला आहे. त्यापूर्वी तुमाने यांच्या कार्यालयात पक्षाच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती पार पडल्या. या तयारीमुळे शिवसेनेने निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची आपली निर्णायक सज्जता दर्शवली आहे.
नागपूर जिल्ह्यात येऊ घातलेल्या १५ नगर परिषदा आणि १२ नगर पंचायतीच्या निवडणुकांसाठी पक्षाकडे उमेदवारी अर्ज सादर केलेल्या इच्छुकांशी तुमाने यांनी थेट संवाद साधला. जिल्ह्यातील काही नगर परिषदांमध्ये शिवसेनेची मजबूत ताकद असल्याने, पुन्हा एकदा स्थानिक पातळीवर आपली शक्ती सिद्ध करण्यासाठी शिवसैनिक सज्ज झाले आहेत. मुलाखती दरम्यान उमेदवारांशी निवडणुकीची रणनीती, स्थानिक समस्या आणि पक्षाची तयारी यावर सखोल चर्चा करण्यात आली.
शिवसेनेचा महायुतीमध्येच लढण्याचा असला तरी, या बैठकीत एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. ज्या ठिकाणी शिवसेना मजबूत स्थितीत आहे, त्या ठिकाणी पूर्ण ताकदीने स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संदीप इटकेलवार, विनोद सातंगे, युवासेना पूर्व विदर्भ संघटक शुभम नवले आणि महिला सेना जिल्हाप्रमुख नेहा भोकरे यांच्यासह विविध नगर परिषदेतील स्थानिक मुख्य नेते व पदाधिकारी उपस्थित होते.