

नागपूर (प्रतिनिधी): नागपूर विभागातील महसूल सेवेसाठी एक आनंदाची बातमी आहे. प्रशासकीय कामकाजात कर्मचाऱ्यांची कमतरता राहू नये आणि पात्र कर्मचाऱ्यांना त्यांच्या हक्काची पदोन्नती वेळेत मिळावी यासाठी महसूल विभागात मोठा निर्णय घेण्यात आला आहे. नागपूर विभागातील महसूल सेवेतील 22 मंडल अधिकारी संवर्गातील कर्मचाऱ्यांना नायब तहसीलदार (राजपत्रित, गट-ब) या महत्त्वाच्या पदावर पदोन्नती देण्यात आली आहे.
महसूल विभागातील पदोन्नती प्रक्रियेला गती देण्यासाठी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्वतः आग्रही भूमिका घेतली होती. त्यांच्या पुढाकारामुळेच ही प्रक्रिया वेळेत पूर्ण झाली आहे.
या शासन आदेशानुसार, 'सहायक महसूल अधिकारी' आणि 'मंडळ अधिकारी' या संवर्गातील कर्मचाऱ्यांसाठी सन 2024 -25या निवडसूची वर्षासाठी ही पदोन्नती देण्यात आली आहे.
पदोन्नतीचा तपशील खालीलप्रमाणे आहे:
नियमित पदोन्नती: 18 मंडळ अधिकारी
तदर्थ पदोन्नती (Ad-hoc Promotion): 1 सहायक महसूल अधिकारी आणि 03 मंडळ अधिकारी
एकूण पदोन्नती: 22 कर्मचारी
पदोन्नती मिळालेल्या कर्मचाऱ्यांच्या नवीन पदस्थापनेची ठिकाणेही यादीत जाहीर करण्यात आली आहेत. पदोन्नती मिळालेल्या अधिकाऱ्यांना त्यांच्या नवीन पदावर 30दिवसांच्या आत रुजू होणे बंधनकारक करण्यात आले आहे. जे अधिकारी या निर्धारित वेळेत रुजू होणार नाहीत, त्यांची पदोन्नती रद्द करण्याची कार्यवाही करण्यात येईल, असेही आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.