

Nagpur Wardha four tigers viral video
नागपूर : काही दिवसांपूर्वी चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी येथे वाघाने एका माणसाला उचलून नेल्याचे आणि नंतर पुन्हा आणून ठेवल्याचे व्हिडिओ खोटे होते ते एआय जनरेटेड होते, असे पुढे आले. खूप गदारोळ झाल्यावर वनविभागाने तसा खुलासाही केला.
मात्र, आता सध्या एकाच शेतात चार वाघ असल्याचा व्हायरल व्हिडिओ अगदी खराखुरा असल्याचे वन विभागाने म्हटले आहे. नागपूर आणि वर्धा जिल्ह्याला लागून असलेल्या शेतात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेरात हे चित्र कैद झाले असून बोर प्रकल्पाच्या कार्यक्षेत्रात हा परिसर येतो.गेल्या काही दिवसांपासून हे वाघ याच परिसरात फिरत आहेत.
या भागात वनविभागाने गस्त सुरू केली असून नागरिकांनी घाबरू नये, असे नागपूर प्रादेशिक वनविभागाच्या उपवनसंरक्षक डॉ. विनिता व्यास यांनी स्पष्ट केले. नागपूर जिल्ह्यातील कोंढाळी जवळच्या एका शेतात एकाच वेळी चार वाघ फिरत असल्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत असून जनतेत दहशत पसरली आहे.