.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
नागपूर : पुढारी वृत्तसेवा
अखेर आज पुन्हा एकदा अंबाझरी तलाव ओव्हर फ्लो झाल्याचे चित्र आहे. कालपासून अंबाझरी ओव्हरफ्लोच्या वाटेवर असल्याने मनपाने 4 पंपाद्वारे पाणी सोडून पाणी पातळी कमी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, आज सकाळी अंबाझरी तलावाशेजारी फिरायला जाणाऱ्या नागरिकांनी मनपाची यंत्रणा नावापुरते पाणी सोडत असून, आपली सुरक्षितता आपणच करा असे आवाहन सोशल मीडियावर केले.
गतवर्षीच्या धक्कादायक जुन्या आठवणींनी लोकांच्या मनात दहशत निर्माण झाली आहे. गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीने अंबाझरी तलावाचे पाणी शिरून धरमपेठ ते सीताबर्डी परिसरात तारांबळ उडविली. शनिवारी व आज रविवारी देखील उपराजधानीत पावसाची संततधार सुरू आहे. कधी रिमझिम तर कधी जोरदार अशा या पावसामुळे अंबाझरी ओव्हर फ्लो होण्याच्या पातळीपासून केवळ 0.04 मीटर दूर असल्याची माहिती महापालिकेने काल जाहीर केली.
अंबाझरी जलाशयाची ओव्हरफ्लो क्षमता ही 316. 24 मीटर अशी आहे. ओव्हरफ्लो बघण्यासाठी नागपूरकरांनी गर्दी केली असून, संभाव्य धोका आणि अजून दोन-तीन दिवस जोरदार पावसाची शक्यता लक्षात घेता खबरदारीची उपायोजना म्हणून मनपाच्यावतीने 4 पंप आणि दोन आऊटलेटच्या मदतीने अंबाझरी जलाशयामधून अतिरिक्त पाणी काल सोडले गेले. मागील पावसाळ्यात गांधीनगर,अंबाझरी, धरमपेठ, शंकरनगरपासून तर थेट मोरभवन,सीताबर्डी, जानकी टॉकीज परिसरात बोट चालताना बघायला मिळाल्या. अनेक पॉश घरांमध्ये, वस्त्यामध्ये घराघरात पाणी घुसले. यामुळे मोठ्या प्रमाणावर हानी झाली.
गेले काही दिवस ओव्हरफ्लोच्या ठिकाणी असलेले आकर्षक असा स्वामी विवेकानंद स्मारकाजवळील पाण्याचा प्रवाह, अवैध बांधकाम यावरून न्यायालयीन संघर्ष सुरू आहे हे विशेष. या पूरस्थितीला कारणीभूत ठरलेले स्मारकाचे हे बांधकाम आजही तसेच असल्याने आता नागपूरकरांनो आपली काळजी आपणच घ्या, शासन, प्रशासनावर विसंबून राहू नका असे आवाहन सोशल मीडियावर सामाजिक कार्यकर्ते, पर्यावरणवाद्यांनी केले आहे.