पुढारी ऑनलाईन डेस्क : भारताची युवा नेमबाज मनू भाकरने आज (दि.२८) पॅरिस ऑलिम्पिकमध्ये इतिहास घडवला. 10 मीटर एअर पिस्तूल प्रकारात तिने कांस्य पदकावर आपली माेहर उमटवली आहे. ऑलिम्पिकमध्ये पदक पटकविणारी ती देशाची पहिली नेमबाज ठरली आहे.
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महिलांच्या 10 मीटर एअर पिस्तूल नेमबाजी प्रकारात मनू भाकरने अंतिम फेरीत धडक मारली. पात्रता स्पर्धेत तिने 580-27 गुणांसह तिसरे स्थान पटकावले होते. अंतिम सामन्यात सुरुवातीपासून तिने अचूक लक्ष्य साधले. आज तिच्या कामगिरीत अचूकता आणि दृढनिश्चय याचे मिश्रण दिसून आले. पाच शॉट्सच्या पहिल्या राउंडला 50.4 शूट करून दुसरे स्थान पटकावले..तिसर्या राउंडमध्ये तिने प्रत्येकी 5 शॉट्सच्या दोन मालिकेनंतर एकूण 100.3अंकांसह मनू तिसर्या स्थानवर राहिली. फायनलमध्ये 20 शॉट्सनंतर, मनू भाकरने २०१.३ गुण मिळवत पदक निश्चित केले. त्याबरोबर या स्पर्धेमध्ये कोरियाच्या ओ ये जिनने वीस शॉट्समध्ये 243.2 गुण मिळवून या स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले. त्यापाठोपाठ कोरियाच्याच किम येजीने वीस शॉट्समध्ये 241.3 गुण मिळवत रौप्यपदक जिंकले.
मी दररोज भगवद्गीतेचे वाचन करते. तुम्ही फक्त कर्म करत राहावा, फळाची अपेक्षा करु नका, असे भगवाग कृष्णांची शिकवण आहे. याच शिकवणीवर मी नेमबाजीचा सराव केला. आज त्याचे फळ मिळाले. देशवासीयांच्या पाठिंबा आणि कुटुंबीयांच्या प्राेत्साहानामुळेच मला हे यश मिळाले, अशी प्रतिक्रिया मनू भाकरने पदक पटकावल्यानंतर दिली.
२२ वर्षीय मनू भाकर ही मूळची हरियाणातील झज्जर येथील. टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत मनूला अपेक्षित कामगिरी करता आली नव्हती. ऐन स्पर्धेवेळी तिची पिस्तुल खराब झाली होती. तिचे २० मिनिटे वाया गेली. यामुळे ती अंतिम फेरीपूर्वीच बाहेर पडली होती. या अपयशाने मनू थाेडी खचली हाेती. मात्र तिला तिच्या कुटुंबीयांची भक्कम साथ लाभली. अपयश हीच यशाची पहिली पायरी मानत तिने पॅरिस ऑलिम्पिकसाठी प्रचंड परिश्रम घेतले. आपल्या दृढनिश्चियाच्या जोरावर तिने जोरदार पुनरागमन करत अंतिम फेरीत धडक मारली होती. कोट्यवधी भारतीयांच्या आशा मनू भाकरच्या कामगिरीकडे लागल्या होत्या. मनूही टोकियो ऑलिम्पिकमधील अपयश धूवून काढत ... पदकाला गवसणी घातली. नेमबाजीत पदक पटकविणारी ती पहिली भारतीय महिला ठरली आहे.