

पुढारी ऑनलाईन डेस्क: मागील काही दिवसांपासून पश्चिम किनारपट्टीवर मान्सून सक्रिय होता. त्यामुळे पश्चिम किनारपट्टीवर व लगतच्या राज्यात अतिवृष्टीसह मुसळधार पाऊस सुरूच होता. परिणामी काही नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली. अनेक भागात पूरपस्थिती निर्माण झाली. दरम्यान हवामान विभागाने पुढील ४ ते ५ दिवसांत उत्तर-पश्चिम (वायव्य) भारतात पुन्हा एकदा मान्सून सक्रीय होणार असून मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे.
हवामान विभागाने दिलेल्या बुलेटीनमध्ये म्हटले आहे की, पुढील ४ ते ५ दिवसांत उत्तर-पश्चिम भारताच्या बहुतांश भागात सक्रिय मान्सूनची स्थिती संभवते. रविवार २८ जुलै रोजी संपूर्ण मध्य प्रदेश, विदर्भ, रविवार २८ आणि सोमवार २९ जुलै, २९ रोजी संपूर्ण गुजरात, २९ जुलै रोजी सौराष्ट्र व कच्छ तसेच रविवार २८ जुलै ते गुरूवार १ ऑगस्ट रोजी कोकण, मध्य महाराष्ट्र आणि गोव्यामधील काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे.
संपूर्ण पूर्व राजस्थानमध्ये रविवार २८ आणि सोमवार २९ जुलै, पश्चिम उत्तर प्रदेश आणि हिमाचल प्रदेशमध्ये बुधवार ३१ जुलै रोजी तर ३१ जुलै ते १ ऑगस्टपर्यंत उत्तराखंडमध्ये देखील अतिमुसळधार पावसाची अंदाज आहे. मंगळवार ३० जुलैपासून पूर्व भारतात एकाकी पावसाच्या हालचालींमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. दरम्यान मुसळधार पावसाची शक्यता असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केली आहे.
महाराष्ट्रातील उत्तर विदर्भ, उत्तराखंड, पश्चिम मध्य प्रदेश या प्रदेशात पुढील २४ तासांत कमी ते मध्यम स्वरूपाच्या पूराची शक्यता देखील भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे.