

Eknath-Shinde on chief minister post
मुंबई: "विधिमंडळाबाहेर पत्रकारांनी मी पुन्हा मुख्यमंत्री होणार का?' असा प्रश्न विचारला. मी मुख्यमंत्री होतो तेव्हाही एक कार्यकर्ता म्हणूनच काम केले, माझ्या डोक्यात कधीही मुख्यमंत्रीपदाची हवा नव्हती. आम्ही जनतेचे सेवक आहोत, मी कॉमन मॅन आहे. मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेलो नाही, आम्हाला जनतेला सोन्याचे दिवस द्यायचे आहेत," अशा शब्दांमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुन्हा मुख्यमंत्री होणार या चर्चेवर आपली भूमिका स्पष्ट केली.
आज विधिमंडळात बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की, काहीजण कुठे कुठे फिरून आले पण साधा बिस्कीटचा पुडा दिला नाही. त्यांनी महायुती सरकारने केलेल्या मदतीचे आकडेही दिले. अमरावती विभागातील २१ लाख शेतकऱ्यांना ३ हजार कोटी, संभाजीनगर विभागाला ६७४६ कोटी आणि पुणे विभागाला १५८६ कोटी रुपये असे एकूण १५ हजार कोटी रुपयांचे वाटप थेट शेतकऱ्यांच्या खात्यात केले आहेत. तसेच, NDRF चे नियम बदल केल्याचेही त्यांनी सांगितले.
'लाडकी बहीण' योजना कधीही बंद होणार नाही. कोणीही आले तरी योजना बंद होणार नाही, २२०० रुपये देणार म्हणजे देणार," असा पुन्नरुच्चारही त्यांनी केला.
मी मुख्यमंत्री होतो तेव्हाही म्हणत होते घटनाबाह्य आहे, उपमुख्यमंत्री आहेत तरी देखील म्हणत आहेत घटनाबाह्य. पण त्यांनी कितीही आदळआपट केली, त्याकडे मी लक्ष देत नाही, असा टोलाही त्यांनी लगावला. कोणीही 'माय का लाल' आला तरी मुंबई महाराष्ट्रापासून तोडणार नाही. कोणी कितीही गळे काढले तरी मुंबई महाराष्ट्रापासून तोडणार नाही," असेही त्यांनी सांगितले.
शैक्षणिक अभ्यासक्रमात छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाला योग्य स्थान मिळवून दिल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी कृषिमंत्री दादा भुसे यांचे विशेष अभिनंदन केले. मराठ्यांचा इतिहास सीबीएसई अभ्यासक्रमात दीड पानाचा होता. दादा भुसे यांनी केंद्रीय मंत्र्यांशी चर्चा करून आता तो इतिहास २१ पानांचा केला आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या इतिहासाला प्राधान्य मिळाले," असे ते म्हणाले.
विदर्भाच्या विकासासाठी आपण काय केले हे महत्त्वाचे आहे. आम्ही चौफेर विकास केला आहे," असे सांगत त्यांनी विदर्भात वीज निर्मिती, अनेक महत्त्वपूर्ण प्रकल्प (उदा. नागपूर येथे हिंगणा येथील मोठा प्रकल्प) आणि गडचिरोलीत कारखाने नेत असल्याचे नमूद केले. प्रती हेक्टर वीस हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.