

'पर्सनॅलिटी राइट्स'बाबत न्यायालयात धाव घेणार गावस्कर ठरले पहिले क्रिकेटपटू
मध्यस्थ संस्थांकडे दाद मागणे हीच योग्य प्रक्रिया : न्या. अरोरा
एक आठवड्यात कारवाईचे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना आदेश
High Court on Sunil Gavaskar’s request
नवी दिल्ली : माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांच्या नावाचा व फोटोचा गैरवापर करणारा बनावट मजकूर तत्काळ हटविण्यात यावा, असा आदेश दिल्ली उच्च न्यायालयाने गुगल, मेटा आणि एक्स (पूर्वीचे ट्विटर) या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना दिला आहे.
टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर, विराट कोहलीसह अन्य क्रिकेटपटूंविषयी गावस्करांनी केलेच नसलेले विधान पसरविण्यात आले होते. यावर त्यांनी विविध व्यक्ती व संस्थांविरोधात याचिका दाखल करत त्यांच्या परवानगीशिवाय त्यांच्या व्यक्तिमत्त्व हक्काचा (पर्सनॅलिटी राइट्स) करत असलेला अनधिकृत वापर रोखण्यात यावा, अशी विनंती गावस्कर यांनी केली होती. याशिवाय, ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर गावस्कर यांच्या नावाने बनावट स्वाक्षरी केलेली स्मृतिचिन्हे व छायाचित्रे विकली जात असल्याचेही याचिकेत नमूद करण्यात आले होते.
गावस्कर यांनी दाखल केलेल्या याचिकेवर शुक्रवादी (दि.१२) दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती मनमीत प्रीतमसिंह अरोर यांच्या एकलपीठासमोर सुनावणी झाली. सुनील गावस्कर यांच्यावतीने ज्येष्ठ वकील गोपाल जैन यांनी युक्तिवाद केला. न्यायमूर्ती मनमीत प्रीतमसिंह अरोरा यांच्या खंडपीठाने सांगितले की, गुगल, मेटा आणि एक्स)यांनी या अर्जाकडे तक्रार म्हणून पाहून एका आठवड्यात निर्णय घ्यावा. सुनील गावस्कर यांनी ४८ तासांत संबंधित यूआरएल मध्यस्थ संस्थांना द्यावेत. या लिंक्स वकिलांमार्फतही सादर करता येतील. मध्यस्थ संस्थांनी आपल्या निर्णयाची माहिती एका आठवड्यात फिर्यादीला द्यावी.
या प्रकरणावर भाष्य करताना न्यायमूर्ती अरोरा म्हणाले की, "अशा तक्रारींमध्ये प्रथम संबंधित मध्यस्थ संस्थांकडे दाद मागणे हीच योग्य प्रक्रिया आहे. अशा प्रकरणी प्रारंभी मध्यस्थांकडे तक्रार करा. बहुतांश तक्रारी निकाली निघतात. उर्वरित बाबींवर न्यायालय अधिक प्रभावीपणे निर्णय देऊ शकते. उगाचच अंदाजाने कारवाई करण्यापेक्षा ही पद्धत अधिक योग्य आहे.”
व्यक्तिमत्त्व अधिकारांच्या (पर्सनॅलिटी राइट्स) उल्लंघनाबाबत न्यायालयात धाव घेणारे सुनील गावस्कर हे पहिले क्रिकेटपटू ठरले आहेत. यापूर्वी अमिताभ बच्चन, ऐश्वर्या राय बच्चन, अभिषेक बच्चन, नागार्जुन, अनिल कपूर, जॅकी श्रॉफ, करण जोहर, श्री श्री रविशंकर आणि जग्गी वासुदेव यांसारख्या अनेक सेलिब्रिटींनी दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल करून आपल्या व्यक्तिमत्त्व अधिकारांचे संरक्षण मिळवले आहे. अलीकडेच अभिनेता सलमान खान यांनीही अशाच स्वरूपाची याचिका दाखल केली आहे.