

Prakash Ambedkar on Eknath Shinde
मुंबई : एकनाथ शिंदे हे पुढील दोन महिन्यांत पुन्हा एकदा राज्याचे मुख्यमंत्री होतील, असा दावा वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी आज (दि.१४) केला. तसेच एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनाच 'खिशात घातल्याचे' विधान करत त्यांनी राज्यातील सर्वच महापालिका निवडणुकीत भाजप आणि शिवसेना शिंदे गटाची युती होईल, असे भाकितही त्यांनी केले आहे.
माध्यमांशी बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, एकनाथ शिंदे यांनी आपली 'स्वत:ची पॉवर' दाखवून दिली आहे. शिंदे यांच्या वाढत्या ताकदीचा पुरावा म्हणून आंबेडकर यांनी महापालिका निवडणुकांच्या संदर्भात भाजप नेत्यांना घ्यावी लागलेली माघार याकडे लक्ष वेधले. महापालिका युतीवरून केला दावा राज्यातील भाजपचे जे नेते महापालिका निवडणुका स्वतंत्र लढणार असल्याचे सांगत होते, त्यांना आता माघार घ्यावी लागली आहे. सर्व महानगरपालिकांमध्ये भाजपला एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेबरोबर युती करूनच लढावे लागणार आहे, अशी माहिती समोर येत असल्याचेही ते म्हणाले.
अमित शहा यांना 'खिशात घातले' या संपूर्ण घडामोडीवर भाष्य करताना आंबेडकर म्हणाले, "एकनाथ शिंदे यांनी स्वत:ची पॉवर दाखवून दिली आहे. त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना स्वत:च्या खिशात घातलं आहे असे दिसत आहे. ही मी एकनाथ शिंदे यांची किमया मानतो. या युतीवरून एकंदरीत चित्र असे दिसत आहे की, शिंदे यांचे राजकीय वजन प्रचंड वाढले आहे. महिना-दोन महिन्यांमध्ये एकनाथ शिंदे हे पुन्हा एकदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील, असा दावाही त्यांनी केला.