

नागपूर : देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सर्वच क्षेत्रात वेगाने विकासकामे सुरू आहेत. आरोग्य, शिक्षण, रोजगार या क्षेत्रांवर विशेष भर देण्यात येत आहे. प्रधानमंत्री मोदी यांचा २०४७ पर्यंतचा विकसित भारताचा संकल्प पूर्ण करण्यात नागपूर जिल्ह्याचे योगदानही मोलाचे ठरणार आहे. सर्वांनी अधिक समृद्ध, सुरक्षित आणि विकसित नागपूर घडवून विकसित भारतासाठी योगदान देण्याचे आवाहन महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शुक्रवारी (दि.१५) केले.
स्वातंत्र्य दिनानिमित्त विभागीय आयुक्त कार्यालय येथे आयोजित मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रमात ते बोलत होते. उत्कृष्ट कार्य करणाऱ्या विभाग व अधिकाऱ्यांचा यावेळी गौरव करण्यात आला. खासदार श्यामकुमार बर्वे, विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी, अतिरीक्त आयुक्त माधवी चवरे-खोडे, पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र सिंगल, विशेष पोलीस महानिरीक्षक संदीप पाटील, महानगरपालिका आयुक्त अभिजीत चौधरी, नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे आयुक्त संजय मीना, महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी, आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार, स्वातंत्र्य सैनिक, ज्येष्ठ नागरिक हे मान्यवर उपस्थित होते.
प्रत्येक घटकातील व्यक्तीला विविध विकास योजनांच्या माध्यमातून प्रगती पथावर आणण्याचे ध्येय राज्य शासनाने निश्चित केले आहे. या ध्येयानुसार ग्रामीण भागासह महानगरापर्यंत नागरिक उत्तम प्रशासनाची अनुभूती घेत असल्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावणकुळे यांनी सांगितले. मजबूत सुरक्षा व्यवस्था उभी करण्याचे काम नागपूर शहर पोलीस दलाने केले आहे. ऑपरेशन थंडर, ऑपरेशन शक्ती, ऑपरेशन युटर्न या अभियानाच्या माध्यमातून पोलीस आयुक्त रविंद्र कुमार सिंगल यांनी केलेल्या कामाचे कौतुकही पालकमंत्र्यांनी यावेळी केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर शहर पोलीस सक्षमीकरणासाठी एका नव्या झोनची निर्मिती केली आहे. त्यातून नागरिकांच्या सुरक्षिततेसह पोलीस दलाला मनुष्यबळ मिळण्यास मदत होणार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
नागपूर शहर सीसीटीव्हीखाली आणण्याचा पूर्णपणे प्रयत्न होत आहे. ग्रामीण पोलीस विभागाने सावनेर शहरात पहिली एआय आधारित सीसीटीव्ही यंत्रणा सुरू केली, याबद्दल त्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. हर्ष पोतदार यांचे जाहीर कौतुक केले. याच आधारावर नागपूर शहरातही शहरभर सीसीटीव्हीचे जाळे निर्माण करण्याचा प्रयत्न असल्याचे पालकमंत्री बावनकुळे म्हणाले. विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी यांचेही पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावेळी कौतुक केले.