

Chandrashekhar Bawankule criticism Rahul Gandhi
नागपूर : काँग्रेस नेते राहुल गांधी वेडे झाले आहेत. ते कधी निवडणूक आयोगावर तर कधी भारतीय सैन्यावर बोलतात. त्यांना अजून या देशाची नाडी, दिशा कळालेली नाही. त्यांना काही दिवस प्रशिक्षणाची गरज आहे. जर विदेशात चांगले प्रशिक्षण मिळत असेल, तर त्यांनी एकदा विदेशात जाऊन यावे. अन्यथा, आमच्याकडेही चांगल्या प्रशिक्षण संस्था आहेत. त्यांनी आम्हाला सल्ला मागितला, तर कुठे जायचे याबाबतचा सल्ला आम्ही त्यांना देऊ शकतो, असे खडेबोल भाजप नेते , महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सुनावले.
राहुल गांधींना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले यावर प्रतिक्रिया देताना ते माध्यमांशी बोलत होते. एकनाथ शिंदे यांचा दिल्ली दौरा आणि महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांशी काहीही काडीमात्र संबंध नाही. ते अधिकार आम्हाला आहेत. जागावाटपाचा निर्णय आम्ही अजित पवार, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस तिघे मिळून घेणार आहोत. दिल्लीत एकनाथ शिंदे यांची झालेली भेट स्थानिक स्वराज्य संस्थांशी निगडित असू शकत नाही, असा दावा त्यांनी केला.
दरम्यान, मेघना बोर्डीकर यांच्या वादग्रस्त विधानावर बोलताना मंत्र्यांनी वादग्रस्त विधान करू नये, असे मी आणि मुख्यमंत्र्यांनी आधीच सांगितले आहे. मेघना ताईंशी मी बोललो. त्यांच्या म्हणण्यानुसार, त्यांच्या वक्तव्याचा संदर्भ वेगळा होता. तरीसुद्धा मंत्री म्हणून आचारसंहिता पाळणे आणि वादग्रस्त विधान टाळणे आवश्यक असल्याचा सबुरीचा सल्ला बावनकुळे यांनी दिला.