

BJP's Sindoor Samman Tricolor Yatra in Kamthi
नागपूर : पुढारी वृत्तसेवा
भारतीय सैन्याने थेट पाकिस्तानच्या विविध शहरात, पाकव्याप्त काश्मीरमध्ये धडक देत दहशतवाद्यांचे तळ उद्धवस्त केले आणि दहशतवाद खपवून घेतला जाणार नाही असा सज्जड इशारा दिला. आठवडाभर युद्धजन्य परिस्थिती, तणावात वायुदल, नौदल, सैन्यदलाच्या पाठीशी महाराष्ट्र नव्हे तर संपूर्ण देश एकजुटीने उभा राहिला. आता सत्तारूढ भाजपने याच मुद्द्यावर सिंदूर सन्मान, तिरंगा यात्रा सुरू केली आहे.
मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत ही यात्रा निघाली. आता शुक्रवारी सकाळी नागपूर जिल्ह्यातील कामठी येथे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मतदारसंघात ही तिरंगा यात्रा निघाली. जिल्हातील अनेक आजी, माजी आमदार, पदाधिकारी स्त्री-पुरुष कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. हाती तिरंगा घेत सर्वजण या यात्रेत सहभागी झाले आहेत.
पहलगाम येथील घटना, 26 पर्यटक, भारतीयांचा दहशतवादी हल्ल्यात झालेला मृत्यू त्यानंतर भारतीय सैन्याने त्याचा वचपा काढत हाती घेतलेले ऑपरेशन सिन्दुर... या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने ठिकठिकाणी तिरंगा सन्मान यात्रा काढण्याचे ठरविले आहे.
दुसरीकडे काँग्रेसने देखील तिरंगा यात्रा आणि मोदी सरकारला प्रश्न विचारणारी जय हिंद सभा ठिकठिकाणी घेण्याचे ठरविले आहे. एकंदरीत आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आणि काही राज्यात विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर हा मुद्दा राजकीयदृष्ट्या ऐरणीचा ठरणार आहे. नागपूर शहरात 18 मे रोजी ही तिरंगा यात्रा काढली जाणार आहे.