

Nagpur-Kolhapur flight service starts
नागपूर : पुढारी वृत्तसेवा
अखेर नागपूर ते कोल्हापूर हवाई सेवेची प्रतीक्षा संपली आहे. नागपूर-कोल्हापूर अशी विमानसेवा सुरू झाली आहे. यामुळे केवळ दीड तासात भाविकांना अंबाबाईच्या दर्शनाला जाता येणार आहे.
आजवर कोल्हापूर येथे जाण्यासाठी रस्ता व रेल्वे मार्गाने लागणारा कालावधी त्रासदायक होता. विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्र जोडणारी ही विमानसेवा मंगळवार ते शनिवार असे आठवड्यातील पाच दिवस उपलब्ध असणार असून, स्टार एयरच्या या विमानसेवने डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ येथून प्रवाशांना नवी सुविधा उपलब्ध झाली आहे.
बंगळुरू येथून आल्यानंतर हे विमान काही काळ नागपूर येथे थांबेल व पुढे कोल्हापूरकडे प्रस्थान करेल. सकाळी दहा वाजता हे विमान सुटणार आहे. त्यामुळे व्यावसायिक पर्यटक विद्यार्थी आणि देवदर्शनासाठी जाणाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. अलीकडेच अमरावती येथून मुंबईसाठी विमान सेवा सुरू झाली. प्रादेशिक विमानसेवांवर राज्यात आता या निमित्ताने भर दिला जात असल्याचे उघड झाले आहे.
दरम्यान देशांतर्गत विमानसेवा विस्तारत असून, अनेक महत्वाची शहरे आंतरराष्ट्रीय विमानतळांना जोडली जात आहेत. यामुळे दळणवळणाच्या सुविधेत वाढ होण्यास हातभार लागणार आहे. तसेच लोकांना कमी कालावधीत एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोहोचणे शक्य होणार आहे.
रस्ते आणि रेल्वे मार्गाने जाणे थोडे वेळखाउ ठरू शकते अशा वेळी विमानसेवा उपलब्ध असेल तर प्रवासी त्या सेवेचा लाभ घेउ शकतात. यातून संबंधित विमान कंपनी आणि प्रवासी अशा दोघांचाही फायदा होणार आहे. तसेच देशांतर्गत पर्यटनासाठी जाणाऱ्या लोकांसाठी देशांतर्गत विमानसेवाही आता गरजेची बनली आहे.