

Nagpur Municipal Corporation Election Nitin Gadkari Ward: महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत नागपुरातून भारतीय जनता पक्षासाठी एक चिंताजनक बातमी समोर आली आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे वास्तव्य असलेल्या आणि त्यांचा मतदारसंघ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रभाग क्रमांक १८ मध्ये भाजपमध्ये मोठी बंडखोरी झाली आहे. भाजपचे सक्रिय पदाधिकारी धीरज चव्हाण यांनी पक्षाच्या अधिकृत उमेदवाराविरुद्ध शड्डू ठोकला असून, आपला उमेदवारी अर्ज मागे न घेता ते निवडणुकीच्या रिंगणात ठाम राहिले आहेत.
प्रभाग १८ हा नागपुरातील सर्वात 'हाय प्रोफाईल' प्रभागांपैकी एक मानला जातो. भाजपने या प्रभागातून सुरुवातीला बंडू राऊत आणि धीरज चव्हाण या दोघांनाही 'एबी फॉर्म' (AB Form) दिले होते. मात्र, अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या क्षणी पक्षाने बंडू राऊत यांची उमेदवारी कायम ठेवत धीरज चव्हाण यांची उमेदवारी नाकारली. या राजकीय हालचालींमुळे नाराज झालेले धीरज चव्हाण अर्ज मागे घेण्याच्या दिवशी दिवसभर 'नॉट रिचेबल' होते. अखेर त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे.
आपल्या भूमिकेबद्दल स्पष्टीकरण देताना धीरज चव्हाण म्हणाले की, "मी याला बंडखोरी मानत नाही. पक्षाने माझ्यावर आणि माझ्या कार्यकर्त्यांवर वारंवार अन्याय केला आहे. आयुष्यभर पक्षासाठी रक्त आटवणाऱ्या सामान्य कार्यकर्त्याच्या भविष्यासाठी आणि त्यांच्या अस्तित्वासाठी मी हे पाऊल उचलले आहे. मागच्या वेळीही माझ्यासोबत असाच अन्याय झाला होता, त्याची पुनरावृत्ती होऊ नये ही कार्यकर्त्यांची आणि मतदारांची इच्छा आहे."
नितीन गडकरी यांचे स्वतःचे मतदान याच प्रभागात असल्याने, येथील बंडखोरी भाजपच्या प्रतिष्ठेचा विषय बनली आहे. पक्षाने मनधरणी करूनही चव्हाण यांनी माघार न घेतल्याने आता भाजपच्या अधिकृत उमेदवारासमोर मोठे आव्हान उभे ठाकले आहे. सामान्य कार्यकर्त्यांच्या अस्मितेचा मुद्दा उपस्थित करत चव्हाण यांनी निवडणुकीत रंगत आणली असून, नागपूर भाजपमधील अंतर्गत कलह आता चव्हाट्यावर आला आहे.