

Nagpur Municipal Election 2025
नागपूर : आगामी महापालिका निवडणुकीसाठी नागपुरात भाजपमध्ये तिकिटांची मारामार कशी सुरू आहे, याविषयीचा एक किस्सा सांगत केंद्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी एका कार्यक्रमात हशा पिकविला.
मी किंवा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकट्याने ठरवून तिकीट देऊ शकत नाही. स्वतः किंवा आपल्या बायकोसाठी टिकीट मागायला येऊच नका लोकांनी तिकीट तुम्हाला द्या, असा आग्रह धरला पाहिजे, असा सबुरीचा सल्ला पदाधिकारी कार्यकर्त्यांना दिला. आम्ही मनपा निवडणुकीच्या काळात कधीकाळी तिकिटाच्या निमित्ताने समोरच्या कार्यकर्त्यांकडून चहा, नाश्ता घेत होतो. गिरीश याचा साक्षीदार आहे.
मला आताच दिलेल्या माहितीनुसार एकाच कुटुंबात चार सदस्यांनी तिकीट मागितले आहे. यात नवरा, बायको, मुलगा आणि बहिण असे चार जण आहेत. मी त्यांना सांगितले आणखी दोन जण सुटले एक म्हणजे त्यांचा ड्रायव्हर आणि दुसरा एखादा चमचा...! कधीकाळी लढण्यासाठी उमेदवार मिळत नसलेल्या पक्षात आज एका तिकिटासाठी 50 दावेदार हे चित्र असल्याचे गडकरी यांनी सांगत कार्यकर्त्यांनी स्वतःपेक्षा पक्ष, देशहित महत्त्वाचे समजावे या दृष्टीने उपयुक्त मार्गदर्शन केले.
याचवेळी त्यांनी एका महिलेने मला नगरसेवक करा असा खूप आग्रह केला. हट्ट धरून बसली. शेवटी ती नगरसेवक झाली. यानंतर तिने पुन्हा महापौरपदासाठी आग्रह धरला. महापौर झाल्यावर मग आमदारकीसाठी आग्रह धरला...! असा हा सत्तेचा मोह कुणालाही सुटत नाही असे सांगताना त्यांनी या महिलेचे नाव मात्र विचारू नका ,असेही सांगितले. यावरून नंतर उपस्थितांमध्ये ही महिला कोण याविषयीची चर्चा रंगली नाही तरच नवल ?