

Nagpur Ward 13 D, Hazari Pahad
नागपूर : महानगरपालिका निवडणुकीसाठी नामांकन अर्ज मागे घेण्याची मुदत शुक्रवारी (दि.२) दुपारी तीन वाजेपर्यंत आहेत. दरम्यान, नागपुरात एक वेगळेच माघारी नाट्य पाहायला मिळत आहे. प्रभाग 13 ड हजारी पहाड परिसरातील समर्थकांनी भाजपच्या एका उमेदवाराला चक्क दाराला कुलूप लावून घरात कोंडून ठेवल्याचा प्रकार समोर आला आहे.
किसन गावंडे असे या उमेदवाराचे नाव आहे. त्यांना अधिकृत उमेदवार म्हणून एबी फॉर्म पक्षाने दिलेला असताना आता याच प्रभागात दोन उमेदवार असल्याने माघार घेण्यास सांगितले जात आहे. मात्र, आमच्या या भागावर उमेदवार निवडीत सतत अन्याय केला जातो. आम्ही कुठल्याही परिस्थितीत त्यांना माघार घेऊ देणार नाही. आज दुपारी तीन वाजेपर्यंत घराचे लॉक उघडणार नाही, असा पवित्रा या समर्थकांनी घेतला आहे.
तर दुसरीकडे स्वतः किसन गावंडे यांनी मात्र आपण निष्ठावान कार्यकर्ता असल्याने माघार घेतो, असे स्पष्ट केले. गेली 40 वर्ष पक्षासाठी काम केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फोन महानगर अध्यक्ष दयाशंकर तिवारी यांना आला. त्यांनी माझ्याशी चर्चा केली आणि मला अर्ज मार्ग घेण्यास सांगितले. मी अर्ज मागे घेण्यासाठी निघालो असताना कार्यकर्त्यांनी मला रोखून धरले, अशी आपबीती त्यांनी सांगितली. आता या माघारी नाट्याचा अंत काय होणार हे दुपारी तीन नंतर अर्थात लवकरच कळणार आहे.