विद्यापीठ परिसरात भाजपच्या नमो युवा महासंमेलनाला परवानगी कशी? अनिल देशमुखांचे राज्यपालांना पत्र | पुढारी

विद्यापीठ परिसरात भाजपच्या नमो युवा महासंमेलनाला परवानगी कशी? अनिल देशमुखांचे राज्यपालांना पत्र

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या महात्मा जोतिबा फुले शैक्षणिक परिसरात भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने ‘नमो युवा महासंमेलन’चे आयोजन करण्यात आले आहे. हा राजकीय कार्यक्रम शासकीय जागेत करीत असताना सर्व नियम धाब्यावर बसविण्यात आले आहेत. या कार्यक्रमाला देण्यात आलेली परवानगी सुध्दा आता वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. या संपुर्ण प्रकरणाची चौकशी करुन जे कोणी दोषी असेल त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी राज्यपाल व कुलपती रमेश बैस यांच्याकडे पत्राव्दारे राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते आ. अनिल देशमुख यांनी केली आहे.

राज्यपांलाना लिहलेल्या पत्रात अनिल देशमुख यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. यात कोणताही कार्यक्रम करीत असताना साधारणता अगोदर परवागी घेण्यात येते आणि नंतर कार्यक्रम जाहीर करण्यात येतो. परंतु अगोदर हा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आणि नंतर विद्यापीठाकडून परवानगी घेण्यात आली. परवानगी देताना काही नियम व अटी साधरणता लावल्या जातात, परंतु या कार्यक्रमला कोणतेही नियम व अटी लावल्या नसल्याची माहिती आहे. विद्यापीठाचे कामकाज सुरु असलेल्या दिवशी ही परवागी कशी देण्यात आली. ज्या ठिकाणी हा कार्यक्रम घेण्यात आला त्या महात्मा जोतिबा फुले शैक्षणिक परिसर हा विद्यापीठाचा मुख्य शैक्षणिक परिसर आहे. याच परिसरात विद्यापिठाचे मुख्य प्रशासकीय कार्यालय आहे. या परिसरात जवळपास ८० टक्के कर्मचारी व अधिकारी ज्यामधे कुलगुरू, प्र. कुलगुरू, कुलसचिव यांची कार्यालये आहेत. असे असतानाही कामाच्या दिवशी ही परवानगी का देण्यात आली? असा सवाल त्यांनी केला आहे.

विद्यापीठाच्या जमनालाल बजाज प्रशाकीय इमारत परिसर हा शांतता झोन आहे. असे असतांना जोरजोराने नारेबाजी करण्यात आली. विद्यापीठाचा संपुर्ण परिसरात हा शासकीय आहे. असे असताना सुध्दा संपुर्ण परिसरात भाजपचे मोठमोठे झेंडे येथे कसे लावण्यात आले? व्यवस्थापन परिषद हे विद्यापिठाच्या हिताचे निर्णय घेणारे सर्वोच्च प्राधिकरण आहे. प्राधीकरणाने राजकीय कार्यक्रम विद्यापीठ परिसरात घेण्याची परवानगी कशी काय दिली? हा एक महत्वाचा प्रश्न यानिमित्ताने निर्माण होतो. यामुळे या कार्यक्रमाची परवानगी कशी देण्यात आली आणि परसिरात नियमांची जी पायमल्ली झाली याची सखोल चौकशी करुन यातील दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी देशमुख यांनी केली आहे.

हेही वाचा : 

Back to top button