नागपूर; पुढारी वृत्तसेवा : नक्षलवाद्यांशी असलेल्या कथित संबंधांच्या आरोपांखाली अटकेत असलेले दिल्ली विद्यापीठाचे प्राध्यापक जी. एन. साईबाबा यांची कारागृहातून मुक्तता करण्यात आली. आज दुपारी चारच्या सुमारास ते माध्यमांशी संवाद साधणार आहेत. मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवारी प्रा. साईबाबा यांच्यासह पाच जणांना निर्दोष मुक्त केले.
जन्मठेपेची शिक्षा भोगणारे जी. एन. साईबाबा व इतरांना तब्बल १० वर्षानंतर ५० हजारांच्या जात मुचलक्यावर सोडण्याचे निर्देश दिलेत. या निकालाने राज्य सरकार आणि पोलीस दलाला मोठा धक्का बसल्याचे बोलले जाते. युएपीए (UAPA) लावताना नियमानुसार कारवाई झाली नव्हती. साईबाबा आणि इतर आरोपींकडून डिजिटल पुरावे गोळा करताना नियम पाळले गेले नव्हते, तसेच प्रोसिक्युशनने ठेवलेले पुरावे जी. एन. साईबाबा आणि इतर आरोपींचे नक्षलवाद्यांशी संबंध सिद्ध करु शकले नाहीत, या ठोस निष्कर्षावर आल्यानंतर न्यायालयामार्फत साईबाबा, प्रशांत राही, हेम मिश्रा, महेश तिरकी आणि विजय तिरकी या सर्वांची सुटका करण्यात आली. स्थगिती संदर्भात सरकारकडून सादर अर्ज फेटाळला गेल्याने सर्वोच्च न्यायालयात जाण्याची सरकारची तयारी आहे.
हेही वाचा :