नागपूर : ओबीसी आंदोलकांसोबत २९ रोजी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांची बैठक | पुढारी

नागपूर : ओबीसी आंदोलकांसोबत २९ रोजी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांची बैठक

नागपूर पुढारी वृत्तसेवा : ओबीसी आंदोलकांशी येत्या २९ सप्टेंबर रोजी राज्य सरकार व ओबीसी संघटनाच्या प्रतिनिधींची बैठक होणार आहे. मुंबईतील सह्याद्री अतिथी गृह येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत ही बैठक होणार आहे.

मागच्या दाराने कुणबी प्रमाणपत्र देणे म्हणजे…

राज्य सरकारकडून मराठ्यांना कुणबी सरसकट प्रमाणपत्र व त्यांचे ओबीसीकरण होऊ देणार नाही असे लेखी आश्वासन मिळेपर्यंत हे आंदोलन सुरूच राहणार असल्याचा निर्धार ओबीसी महासंघाचे नेते, अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे आता ओबीसी आंदोलनाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मराठा समाजाला मागच्या दाराने कुणबी प्रमाणपत्र देणे म्हणजेच त्यांचे ओबीसीकरण करणे आहे. आम्ही हे कुठल्याही परिस्थितीत खपवून घेणार नाही, असा सज्जड इशारा ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे यांनी यापूर्वीच दिला आहे.

नागपुरातील संविधान चौकात गेल्या १३ दिवसांपासून ओबीसी समाजाचे, विविध संघटनांचे आंदोलन सुरू असून १२ दिवसापासून चंद्रपुरात अन्नत्याग आंदोलन सुरू आहे. रवींद्र टोंगे यांची प्रकृती खालावली आहे. याकडे सरकारला लक्ष देण्यास वेळ नाही. मराठा समाजाच्या उपोषणाची, आंदोलनाची तातडीने दखल घेण्यात आली. मात्र,ओबीसी समाजाला दुर्लक्षित केले जात आहे. हे केवळ मराठ्यांचे सरकार आहे का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. ही दोन्ही आंदोलने तूर्त सुरूच राहणार असल्याचे समजते.

हेही वाचा

Back to top button