सांगली : उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या कामाचा धडाका; खानापुरातील ३६ गावांत टंचाई घोषित

विटा : पुढारी वृत्तसेवा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कामाचा धडाका आज खानापूर मतदारसंघातील लोकांना अनुभवायला मिळाला. माजी नगराध्यक्ष वैभव पाटील यांनी अजित पवारांना खानापूर मतदार संघातील पाणी टंचाईच्या परिस्थितीबाबत भेटून माहिती दिली होती. या भेटीला ४८ तास होतात न होतात तोच शासनाकडून तब्बल ३६ गावांमध्ये टंचाई घोषीत करण्यात आली आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विट्याचे माजी नगराध्यक्ष वैभव पाटील यांनी १९ सप्टेंबरला भेटून खानापूर, आटपाडी व विसापूर सर्कल मध्ये शेतीसाठी टेंभू आणि ताकारी योजनेतून पाणी सोडण्याची व्यवस्था, पिण्याचे पाणी टँकर सुरु करा, जनावरांसाठी चारा छावणी, चारा डेपो सुरु करण्याबाबत शासन स्तरावरून निर्णय होण्यासाठी संबंधितांना योग्य ते आदेश द्यावेत अशी विनंती करणारे पत्र दिले. मात्र या घटनेच्या पुढच्या ४८ तासांत विट्याचे प्रांताधिकारी डॉ. विक्रम बांदल यांनी वैभव पाटील यांना एक पत्र दिले आहे. या पत्रांत खानापूर मतदार संघामध्ये चारा छावणी, चारा डेपो आणि पाणी व्यवस्था करण्याबाबत आपण जे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निवेदन दिले होते त्यावर तात्काळ कार्यवाही करत खानापूर आणि आटपाडी तालुक्यातील अनुक्रमे १४ आणि २५ गावांमध्ये टंचाई घोषित करण्यात आलेली आहे.
तसेच पाणी टंचाईच्या अनुषंगाने तहसिलदार आटपाडी यांच्या मागणी नुसार आटपाडी तालक्यामध्ये एकूण ६ गावा मध्ये ८ टँकरने पाणी पुरवठा सुरू करण्यात आलेला आहे. सध्यस्थितीत एकही पाणी टँकर मागणीचा प्रस्ताव प्रलंबित नाही. तसेच चारा टंचाईच्या अनुषंगाने तालुका कृषी अधिकारी खानापूर व आटपाडी यांचा मागविण्यात आला होता. यानुसार खानापूर तालुक्यात १ लाख १९ हजार ७६१ टन तसेच आटपाडी तालुक्यात १ लाख ३ हजार ९९५ मेट्रिक टन चारा उपलब्ध आहे. त्यानंतरही चाऱ्याची गरज पडल्यास त्या अनुषंगाने आवश्यक ती कार्यवाही करण्यात येईल असेही प्रांताधिकारी डॉ. बांदल यांनी म्हंटले आहे.
हेही वाचा :