वनदेवी नगर येथे महावितरणच्या कर्मचाऱ्यांना मारहाण

File Photo
File Photo

नागपूर,पुढारी वृत्‍तसेवा : बिनाकी विभागातील वनदेवीनगर परिसरात फ्यूजकॉलची तक्रार दुरुस्त करायला गेलेल्या महावितरणच्या कर्मचारी आणि शिडी वाहनावर गुरुवारी रात्री ९.३० च्या सुमारास अज्ञात हल्लेखोरांनी दगड आणि विटांनी हल्‍ला केला. सुदैवाने महावितरण कर्मचारी थोडक्यात बचावले.

याबाबत मिळालेल्‍या माहितीनुसार, सकाळी याच भागात वीजचोरी पकडण्यास गेलेल्या महावितरणच्या २ कर्मचाऱ्यांना मारहाण करण्यात आली होती. या दोन्ही घटनाप्रकरणी यशोधरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बिनाकी वितरण केंद्राचे कर्मचारी वनदेवीनगर झोपडपट्टीतील वीजचोरी पकडण्यात आणि वीजबिल न भरणाऱ्या ग्राहकांकडून बिल वसूल करण्यास गेले असता याच परिसरात राहणारा इलियास ए. रशीद विजेच्या तारेला आकडा लावून घराला चोरीची वीज घेत असल्याचे आढळले. इलियासकडे महावितरणचे १८,७३० रुपये वीज बिल थकबाकी आहे. बिल न भरल्याने वीज पुरवठा कायमचा खंडित करून मीटरही जप्त करण्यात आले.

महावितरणचा तंत्रज्ञ राहुल मोहाडीकर याने विजेच्या तारेवरील आकडा काढला आणि खाली उभा असलेला दुसरा कर्मचारी लखन चौरसिया याने वायर कापण्यास सुरुवात केली. कारवाईचे वेळी इलियासची पत्नी घरात हजर होती. महावितरणच्या या कारवाईमुळे संतप्त झालेल्या दोघांनी कर्मचाऱ्याकडील तार हिसकावून पुन्हा हुक लावण्याचा प्रयत्न केला, त्याला महावितरण कर्मचाऱ्यांनी विरोध केला. महावितरणच्या कारवाईमुळे संतप्त झालेल्या दोघांनी राहुल मोहाडीकर यांना बेदम मारहाण केली. यावेळी मदतीसाठी धावलेल्या लखन चौरसियालाही लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली.

यावेळी इतर कर्मचारी मारहाणीचा व्हिडिओ करत असताना कर्मचाऱ्यांना देखील धमकी देण्यात आली. मारहाण केल्यानंतर दोन्ही हल्लेखोर तेथून निघून गेले. याप्रकरणी महावितरणचे कर्मचारी राहुल मोहाडीकर यांच्या तक्रारीवरून यशोधरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

.हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news