

Two Arrested Gadchiroli
गडचिरोली : जिल्ह्यात दारूबंदी असतानाही अवैध दारूची वाहतूक करण्यासाठी नवनवीन शक्कल लढविली जात असल्याचे समोर आले आहे. दुचाकींच्या पेट्रोल टाकी व सीटच्या आतील जागेत देशी दारूच्या बाटल्या लपवून वाहतूक करणाऱ्या दोघांना गडचिरोली पोलिसांनी पकडले. या कारवाईत दोन दुचाकींसह एकूण २ लाख ३२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या प्रकरणी तानाजी नानाजी पेंदोरकर (३२) व सौरभ प्रकाश महाजनवार (१९), दोघेही रा.व्याहाड (बु.),ता.सावली,जि.चंद्रपूर अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.
ही कारवाई १८ ऑक्टोबर रोजी गडचिरोली-चंद्रपूर मार्गावरील वैनगंगा नदीजवळ करण्यात आली. पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे या ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली होती. दरम्यान, भरधाव वेगाने येणाऱ्या दोन दुचाकींना पोलिसांनी थांबवून तपासणी केली. त्यावेळी दुचाकींच्या पेट्रोल टाकी व सीटच्या आतील भागात देशी दारूच्या बाटल्या लपविल्याचे आढळून आले.
या प्रकरणी तानाजी पेंदोरकर व सौरभ महाजनवार यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून रॉकेट संत्रा देशी दारूच्या ९० मिली क्षमतेच्या प्रत्येकी २०० बाटल्या असलेले दोन साठे, असे एकूण ४०० नग जप्त करण्यात आले. या दारूची किंमत ३२ हजार रुपये असून, वाहतुकीसाठी वापरलेल्या दोन दुचाकींची अंदाजित किंमत २ लाख रुपये आहे.
याप्रकरणी गडचिरोली पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १५६६/२०२६ अन्वये महाराष्ट्र दारूबंदी कायद्यातील कलम ६५(अ) व ८३ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास गडचिरोली पोलीस करीत आहेत.
जिल्ह्यातील अवैध व्यवसायांना आळा घालण्यासाठी सीमांवर २४ तास नाकाबंदी राबविण्यात येत असल्याचे पोलीस अधीक्षक एम. रमेश यांनी सांगितले. त्यांच्या आदेशानुसार, वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विनोद चव्हाण यांच्या नेतृत्वात ही कारवाई करण्यात आली.