

Chamorshi Land Acquisition Protest
गडचिरोली : प्रस्तावित लोह प्रकल्पासाठी एमआयडीसीने शेतजमीन अधिग्रहीत करु नये, या मागणीसाठी १४ गावांतील शेकडो पुरुष आणि महिला शेतकऱ्यांनी १५ ऑक्टोबरपासून चामोर्शी येथे चक्काजाम आंदोलन सुरु केले आहे.
चामोर्शी तालुक्यातील भेंडाळा परिसरात जेएसडब्लू कंपनीने स्टील प्रकल्प प्रस्तावित केला आहे. त्यासाठी एमआयडीसीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या जमिनी अधिग्रहीत करण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. ४ महिन्यांपूर्वी या अधिग्रहणाविरोधात भेंडाळा व परिसरातील १४ गावांतील हजारो स्त्री-पुरुष शेतकऱ्यांनी गडचिरोली येथे जिल्हाधिकारी कार्यालयापुढे ठिय्या आंदोलन केले होते.
त्यावेळी सहपालकमंत्री आशिष जयस्वाल यांनी मध्यस्थी करीत आक्षेप घेण्यासाठी शेतकऱ्यांना ९० दिवसांची मुदत देत मुख्यमंत्र्यांसमवेत बैठक घडवून आणण्याचे आश्वासन दिले होते. परंतु तशी बैठक अद्यापही झाली नाही. मात्र, शेतकऱ्यांना पुन्हा सुनावणीसंदर्भात नोटीस देण्यात आल्याने शेतकरी संतापले आहेत.
प्रशासनाच्या या कृतीला विरोध करण्यासाठी १५ ऑक्टोबरपासून १४ गावांतील शेतकऱ्यांनी चामोर्शीच्या मुख्य चौकात चक्काजाम आंदोलन सुरु केले. रात्री शेतकऱ्यांनी रस्त्यालगत स्वयंपाक करून आंदोलनस्थळीच जेवण आणि मुक्कामही केला. आज दुसऱ्या दिवशीही शेतकऱ्यांचे आंदोलन सुरुच होते. आधी मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेऊन चर्चा करावी, नंतरच पुढील प्रक्रिया करावी, अशी शेतकऱ्यांची भूमिका आहे.
दरम्यान, आ.डॉ.मिलिंद नरोटे यांनी आज सकाळी चामोर्शी येथे आंदोलनस्थळी भेट देत शेतकऱ्यांशी चर्चा केली. महसूल व पोलिस अधिकाऱ्यांनीही घटनास्थळी जाऊन शेतकऱ्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. परंतु सुपीक जमीन देण्यास शेतकऱ्यांनी ठाम नकार दिला आहे.