

Binagunda Police Help Center
गडचिरोली : एकेकाळी नक्षल्यांचा बालेकिल्ला अशी ओळख असलेल्या भामरागड तालुक्यातील बिनागुंडा येथे गडचिरोली पोलिसांनी स्थापन केलेल्या नव्या पोलिस मदत केंद्राचे उद्घाटन नक्षलविरोधी अभियानाचे विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांच्या हस्ते आज झाले.
पोलिस उपमहानिरीक्षक अंकित गोयल, पोलिस अधीक्षक नीलोत्पल, केंद्रीय राखीव पोलिस दलाचे कमांडंट शंभू कुमार, अपर पोलिस अधीक्षक एम.रमेश, कार्तिक मधिरा, गोकुल राज, उपविभागीय पोलिस अधिकारी अमर मोहिते तसेच अन्य अधिकारी उपस्थित होते.
बिनागुंडा पोलिस ठाणे छत्तीसगढ राज्याच्या सीमेपासून ८ किलोमीटर अंतरावर आहे. मुलभूत सुविधांचा अभाव असलेला हा भाग नक्षल्यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होता. येथूनच छत्तीसगड राज्यात नक्षल्यांची एन्ट्री होत होती. परंतु आज नवे पोलिस मदत केंद्र सुरु झाल्याने नक्षल्यांना त्या भागात वावर करणे कठीण झाले आहे.
याप्रसंगी आयोजित जनजागरण मेळाव्यात महिला आणि पुरुषांना कपडे, शेती व दैनंदिन वापराचे साहित्य तसेच विद्यार्थ्यांना शालेय आणि क्रीडा साहित्याचे वाटप करण्यात आले. मागील दोन वर्षांत गडचिरोली पोलिसांनी गर्देवाडा, वांगेतुरी, नेलगुंडा, कवंडे, फुलणार, तुमरकोठी इत्यादी अतिसंवेदनशिल ठिकाणी पोलिस मदत केंद्रे उभारली आहेत. छत्तीसगडच्या सीमावर्ती भागातील बिनागुंडा येथे उभारलेले पोलिस मदत केंद्र हे दहावे मदत केंद्र आहे.
बिनागुंडा येथील पोलिस मदत केंद्राच्या निर्मितीसाठी १०५० मनुष्यबळ, ११ जेसीबी, १० ट्रेलर, ५ पोकलेन आणि ४० ट्रक कामाला लावण्यात आले होते. अवघ्या एका दिवसात हे पोलिस मदत केंद्र निर्माण करण्यात आले आहे.
बिनागुंडा येथील नव्या पोलिस मदत केंद्रात ४ पोलिस अधिकारी, ५६ अंमलदार, राज्य राखीव दलाची १९ बटालियन, कुसळगाव बी कंपनीचे २ प्लाटून, केंद्रीय राखीव दलाच्या ९ क्रमांकाच्या बटालियने १ सहायक कमांडंट, ७९ अंमलदार, ८ विशेष अभियान पथकातील २०० जवान तैनात करण्यात आले आहेत.
बिनागुंडा परिसरातील गुंडेनूर नाल्याला पावसाळ्यात पूर येत असल्याने बंगाडी, कुवाकोडी, फोदेवाडा, बिनागुंडा व अन्य गावांचा संपर्क तुटतो. आता गुंडेनूर नाल्यावर पूल बांधण्यात येत असून, नव्या पोलिस मदत केंद्रामुळे त्यास सुरक्षेसह कामास गती मिळणार आहे. शिवाय राष्ट्रीय महामार्गाचे कामही अडथळ्याविना होणार असून, रखडलेली ७ मोबाईल टॉवरची कामे पूर्णत्वास जाणार आहेत. रस्ते आणि पुलाची कामे झाल्यास त्या भागात अव्याहत बससेवा सुरु करण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.