

Gadchiroli Porla Murder Case
गडचिरोली : दारू पिण्यासाठी पैसे दिले नाही, म्हणून पेट्रोल ओतून जाळलेल्या पत्नीने महिनाभर झुंज दिल्यानंतर प्राण सोडला. गडचिरोली तालुक्यातील पोर्ला येथे घडलेल्या या संतापजनक घटनेने समाजमन ढवळून निघाले आहे. प्रियंका सुशील बारसागडे (वय २६) असे मृत महिलेचे नाव आहे. सुशील बारसागडे या क्रूरकर्मा पतीस पोलिसांनी अटक केली आहे.
सुशील बारसागडे हा मजुरी करुन उदरनिर्वाह करायचा. सावली तालुक्यातील निलसनी पेडगाव येथील प्रियंका बोदलवार हिच्याशी त्याची ओळख झाली. २०१८ मध्ये दोघांनी कुटुंबाचा विरोध झुगारुन प्रेमविवाह केला. सुरुवातीला दोघांचा संसार व्यवस्थित सुरु होता. परंतु, नंतर सुशीलला दारुचे व्यसन जडल्यानंतर दोघांमध्ये खटके उडू लागले. तो दारुसाठी पत्नी प्रियंकाशी भांडण करु लागला. १६ डिसेंबर २०२५ रोजी अगदी पहाटेला ५ वाजताच्या सुमारास सुशीलने प्रियंकाला दारू पिण्यासाठी पैसे मागितले. मात्र, प्रियंकाने पैसे देण्यास नकार दिला. यामुळे संतापलेल्या सुशीलने तिला बेदम मारहाण करुन कपाटातील २ हजार रुपये नेले.
काही वेळाने तो घरी परतला. तेव्हा प्रियंका स्वयंपाकघरात काम करत होती. रागाच्या भरात सुशीलने मागून येऊन प्रियंकाच्या अंगावर पेट्रोल ओतून तिला जाळले. प्रियंकाने आरडाओरड करताच तिची ५ वर्षीय मोठी मुलगी सुप्रिया ही जोरजोराने रडू लागली. तिचा आवाज ऐकून शेजारी धावत गेले. मात्र, तोपर्यंत प्रियंका जवळपास ४० ते ५० टक्के जळाली होती.
प्रियंकावर जिल्हा सामान्य रुग्णालयात प्रथमोपचार केल्यानंतर तिला नागपूर येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात भरती करण्यात आले. मात्र, तेथे प्रकृती खालावल्याने तिला खासगी दवाखान्यात हलविण्यात आले. महिनाभराच्या उपचारानंतर २० जानेवारीला तिने प्राण सोडला. उपचारादरम्यान तिने वडील अशोक बोदलवार यांना घटनाक्रम सांगितला. त्यानंतर वडिलांच्या फिर्यादीवरून गडचिरोली पोलिसांनी सुशील बारसागडे याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करुन अटक केली. न्यायालयाने त्यास पोलिस कोठडी सुनावली आहे.
प्रियंकाला दोन मुली आहेत. मोठी मुलगी सुप्रिया ही ५ वर्षांची, तर लहान मुलगी तीन महिन्यांची आहे. आईचा मृत्यू झाला, तर वडील पोलिस कोठडीत आहेत. वडिलांना आईवडील नसल्याने आता दोन्ही मुलींच्या पालनपोषणाची जबाबदारी आईच्या वृद्ध आई-वडिलांवर येऊन ठेपली आहे. सध्या मोठी मुलगी त्यांच्याकडे आहे, तर लहान मुलीला शिशूगृहात ठेवण्यात आले आहे.