

Gadchiroli Forest Field Assistant Arrested
गडचिरोली : वनजमिनीवर अवैध काम करीत असल्याचे सांगून ट्रॅक्टर पकडल्यानंतर दंड कमी करण्यासाठी ट्रॅक्टर चालकास १० हजारांची लाच मागणाऱ्या क्षेत्र सहायकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी बुधवारी (दि.२१) रंगेहाथ पकडून अटक केली. महेश जयंतराव धामनगे(४७) असे आरोपीचे नाव आहे. तो अहेरी तालुक्यातील कमलापूर वनपरिक्षेत्रांतर्गत राजाराम खांदला उपक्षेत्रात कार्यरत होता.
एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारकर्ता हा तेलंगणा राज्यातील रहिवासी असून, तो राजाराम खांदला येथे काकाच्या ट्रॅक्टरद्वारे दुसऱ्या शेतकऱ्यांच्या शेतीची मशागत करुन उदरनिर्वाह करीत होता. काम सुरु असताना दोन वनरक्षकांनी वनजमिनीवर अवैध काम करीत असल्याचे सांगून ट्रॅक्टर जप्त केला. त्यानंतर क्षेत्रसहायक महेश धामनगे याने गुन्हा दाखल न करता दंडाची रक्कम कमी करण्यासाठी ट्रॅक्टरचालकास २५ हजार रुपयांची मागणी केली.
तडजोडीअंती तो १० हजार रुपये स्वीकारण्यास तयार झाला. परंतु लाच देण्याची तक्रारकर्त्याची मुळीच इच्छा नसल्याने त्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यानुसार एसीबीने काल सापळा रचला असता महेश धामनगे याने १० हजार रुपयांची लाच स्वीकारताना आढळून आला. त्याच्यावर राजाराम खांदला उपपोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर धामनगे याच्या राजाराम खांदला व चंद्रपूर येथील निवासस्थानांची झडती घेण्यात आली.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस अधीक्षक दिगंबर प्रधान, अपर पोलिस अधीक्षक माधुरी बाविस्कर, विजय माहुलकर यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपअधीक्षक विक्रांत सगणे, पोलिस निरीक्षक किरण बगोटे, हवालदार किशोर जौंजाळकर आदींनी ही कारवाई केली.