

Infant Death Gadchiroli
गडचिरोली : एका गरोदर महिलेला गंभीर अवस्थेत ग्रामीण रुग्णालयातून गडचिरोलीच्या महिला व बाल रुग्णालयात दाखल केल्यानंतर प्रसूतीदरम्यान बाळ दगावले, तर प्रसूतीनंतर काही तासांनी मातेचाही मृत्यू झाला. ही हद्रयद्रावक घटना रविवारी (दि.२३) घडली. जिजा हंसराज सातर (वय २१, रा.जामगिरी, ता.चामोर्शी) असे मृत महिलेचे नाव आहे.
जिजा सातर यांचा गरोदरपणाचा कालावधी पूर्ण झाला होता. रविवारी पहाटे ५ वाजताच्या सुमारास पोटात दुखू लागल्याने त्यांना चामोर्शी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. सकाळी ९ वाजतापासून जिजाबाईला प्रसूतीकळा सुरू झाल्या. काही वेळात प्रसूती होईल, असे तेथील परिचारिकांनी सांगितले. परंतु तोपर्यंत डॅाक्टर आलेले नव्हते.
अखेर त्रास वाढत असूनही प्रसूती होत नसल्याने परिचारिकेनेच तपासून गडचिरोलीला रेफर करण्याचा सल्ला दिला. त्यानंतर डॅाक्टरला रेफर लेटरवर सही करायला या, असा निरोप परिचारिकेने दिला आणि नंतर डॅाक्टर आले, असे हंसराज सातर यांनी सांगितले. गडचिरोलीला नेण्यास उशीर होईल, त्यामुळे येथेच सिझर करा, अशी विनंती सातर यांनी केली. मात्र, त्यांचे म्हणणे कोणीही ऐकले नाही. त्यामुळे सकाळी साडेदहा वाजताच्या सुमारास त्यांना गडचिरोलीला रवाना करण्यात आले.
गडचिरोलीच्या महिला व बाल रुग्णालयात पोहोचल्यानंतर लगेच जिजा यांना प्रसूतीकक्षात घेण्यात आले. परंतु प्रसूती होताच बाळ दगावल्याचे निदर्शनास आले. रात्री ९.५० च्या सुमारास जिजा यांनीही प्राण सोडला.
चौकशी समिती गठित
माता व बाळाच्या मृत्यूप्रकरणाची सखोल व निष्पक्ष चौकशी करण्यासाठी जिल्हा शल्यचिकित्सक स्तरावर चौकशी समिती गठित करण्यात आली आहे. सर्व संबंधित बाबींची सविस्तर तपासणी करण्यात येत असून, चौकशी अहवालानंतर पुढील आवश्यक कारवाई करण्यात येईल, असे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.वर्षा लहाडे यांनी सांगितले.
दोषींवर कारवाई करण्याची मागणी
दरम्यान, याप्रकरणी माजी पंचायत समिती सदस्य अमिता मडावी यांनी तातडीने पत्रकार परिषद घेत दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. ही केवळ प्रसूतीतील गुंतागुंत नसून, हलगर्जीपणामुळे वेळेवर उपचार न मिळाल्याने बाळ आणि मातेचा मृत्यू झाल्याचा आरोप मडावी यांनी केला. चामोर्शीच्या ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.प्रवीण किलनाके व गडचिरोली येथील महिला व बाल रुग्णालयाच्या अधीक्षक डॉ.माधुरी किलनाके यांना निलंबित करावे, अशी मागणीही त्यांनी केली.
काँग्रेस नेत्या माधुरी मडावी यांनीही कर्तव्यात कसूर करणाऱ्या प्रत्येक अधिकारी व कर्मचाऱ्याची सखोल चौकशी करुन दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. या प्रकरणात निष्काळजीपणा झाला असेल, तर त्याची जबाबदारी निश्चित केली पाहिजे. संबंधित डॉक्टरांची उपस्थिती, उपचाराची वेळ, रेफर करण्याचा निर्णय, रेफर लेटरवरील स्वाक्षरी तसेच उपचाराची संपूर्ण नोंद तपासण्यात यावी,अशीही मागणी माधुरी मडावी यांनी केली आहे.