

गडचिरोली : देसाईगंज तालुक्यातील आमगाव ग्रामपंचायतींतर्गत असलेल्या नवीन लाडज या पुनर्वसित गावाला अखेर अधिकृत महसुली ओळख मिळाली आहे. तालुका भूमी अभिलेख विभागाच्या प्रयत्नांमुळे हे गाव शासनाच्या भूनकाशावर आले असून, महाभूमी संकेतस्थळावर गावाचा स्वतंत्र नकाशा ऑनलाइन उपलब्ध झाला आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी तालुक्यातील जुनी लाडज येथील पूरग्रस्तांचे १९६१-६२ मध्ये देसाईगंज तालुक्यातील आमगाव ग्रामपंचायतींतर्गत ‘नवीन लाडज’ या नावाने पुनर्वसन करण्यात आले होते. मात्र, तब्बल ६४ वर्षे या गावाला स्वतंत्र महसुली ओळख मिळाली नव्हती.
३ नोव्हेंबर २०१६ रोजी तत्कालिन जिल्हाधिकाऱ्यांनी नवीन लाडज वाडीचे गावात रूपांतर करण्याची अधिसूचना काढली होती. मात्र, त्याची अंमलबजावणी न झाल्याने गावकऱ्यांना विविध अडचणींचा सामना करावा लागत होता. गावकऱ्यांनी ९ जानेवारी २०२५ पासून सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर १७ सप्टेंबर रोजी जमाबंदी आयुक्त, पुणे यांनी गावाला स्वतंत्र व्हिलेज कोड बहाल केला.
मात्र, स्वतंत्र नकाशा उपलब्ध नसल्याने येथील शेतकऱ्यांना फॉर्मर आयडी आणि ॲग्रीस्टॅक नोंदणी करताना अडचणी येत होत्या. आज १८ ऑगस्ट २०२६ पासून गाव भूनकाशावर आल्याने ऑनलाइन नकाशा, सातबारा, प्लॉट रिपोर्ट तसेच विविध महसुली पुरावे सहज उपलब्ध होणार आहेत. जमीन खरेदी-विक्री आणि कर्जप्रकरणांसाठीही आवश्यक कागदपत्रे मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
भूमी अभिलेख विभागाच्या माहितीनुसार, प्लॉट रिपोर्टमध्ये सर्वे क्रमांक, धारकाचे नाव, खाता क्रमांक आणि चतु:सीमा स्पष्टपणे दिसणार आहे. नवीन लाडजला महाभूमी संकेतस्थळावर आणण्यासाठी देसाईगंज तालुका भूमी अभिलेख विभागाचे अभिलेखापाल तन्मय फेंडर, छानणी लिपिक राजेश सहारे आणि निमतांदार मनोज दांडवे यांनी विशेष मेहनत घेतली. जिल्हा अधीक्षक विजय भालेराव यांच्या माध्यमातून प्रस्ताव जमाबंदी आयुक्तांकडे पाठवून त्यास मान्यता मिळविण्यात आली.
तालुका भूमी अभिलेख उपअधीक्षक मुकेश सेलोकर म्हणाले, “महाभूनकाशा वेबसाइटवर नवीन लाडज गाव अधिकृतपणे आले आहे. गावाला ओळख मिळवून देण्यासाठी आमच्या टीमने अथक परिश्रम घेतले. आता गावकऱ्यांना सर्व महसुली सुविधा एका क्लिकवर मिळतील.”
नवीन लाडज भूनकाशावर आल्याचे प्रमुख फायदे :
*फॉर्मर आयडी आणि ॲग्रीस्टॅक नोंदणी सुलभ होणार
*ऑनलाइन सातबारा, नकाशा आणि प्लॉट रिपोर्ट उपलब्ध होणार
*जमीन खरेदी-विक्री व कर्जासाठी आवश्यक महसुली पुरावे सहज मिळणार