Gadchiroli Accident : बेडगाव घाटात भीषण अपघात; ट्रकचा ब्रेक फेल होऊन SUV चिरडली, तीन वाहने दुर्घटनाग्रस्त

सुदैवाने जीवितहानी टळली; लोखंडी सळ्या रस्त्यावर, डिझेल सांडल्याने काही काळ भीतीचे वातावरण
Gadchiroli Accident
Published on
Updated on

गडचिरोली : कोरची-कुरखेडा राष्ट्रीय महामार्गावरील बेडगाव घाटात बुधवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास भीषण अपघात घडला. छत्तीसगडहून कुरखेडाकडे येणाऱ्या मालवाहू ट्रकचा ब्रेक निकामी झाल्याने ट्रकने समोरून येणाऱ्या महिंद्रा XUV300 कारला जोरदार धडक दिली. धडकेची तीव्रता इतकी प्रचंड होती की कारचा अक्षरशः चुराडा झाला. या अपघातात आणखी एक टाटा पंच कारही धडकेच्या चपेटीत आली, तर ट्रक रस्त्याच्या कडेला उलटला. मात्र, एवढ्या मोठ्या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याने सर्वांनी सुटकेचा निःश्वास सोडला.

मिळालेल्या माहितीनुसार, घाटातील चढावर एक ट्रक बंद पडून उभा असताना उतारावरून येणाऱ्या CG-07 BK-8413 क्रमांकाच्या ट्रकवरील चालकाचे नियंत्रण सुटले. ट्रकने विरुद्ध दिशेने येणाऱ्या महिंद्रा XUV300 (MH-33 AD-3681) ला जोरदार धडक दिली. धडकेनंतर कार दोन ट्रकाच्या मध्ये अडकून पूर्णपणे चकनाचूर झाली.

Gadchiroli Accident
Gadchiroli Naxal | नक्षल सप्ताहात मोठी कारवाई : जंगलात पुरून ठेवलेली १४ अग्निशस्त्रे, स्फोटक साहित्य जप्त

या कारमधून कुरखेडा येथील कंत्राटदार रामसुख चोयल हे मित्र प्रमोद मेश्राम यांच्या कुटुंबीयांना शालेय प्रवेशासाठी राजनांदगाव येथे घेऊन जात होते. अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तत्काळ मदतीसाठी धाव घेत सर्व प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढले.

अपघातात टाटा पंच (MH-31 GG-3162) मधील माणिक कवडू मेश्राम (वय ५७, रा. उदापूर, ब्रह्मपुरी) यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून त्यांना सात टाके पडले आहेत. त्यांच्यावर कुरखेडा उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळाली.

Gadchiroli Accident
Gadchiroli Crime : अल्पवयीन मुलीचा विनयभंग; आरोपीला ३ वर्षांच्या कारावासासह १० हजाराचा दंड

अपघातानंतर ट्रकमधील लोखंडी सळ्या रस्त्यावर विखुरल्या, तर डिझेलची टाकी फुटल्याने मोठ्या प्रमाणात डिझेल रस्त्यावर सांडले. त्यामुळे काही काळ स्फोटाची भीती निर्माण झाली होती. मात्र, नागरिकांच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला.

घटनेची माहिती मिळताच पुराडा येथील सहायक पोलीस निरीक्षक रवींद्र म्हैसकर यांनी घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत केली. अपघातग्रस्त वाहने हटवून काही वेळातच घाटातील वाहतूक पूर्ववत करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

बेडगाव घाट धोकादायक

बेडगाव घाटात वारंवार अपघात होत असून अनेकांना यापूर्वी जीव गमवावा लागला आहे. तीव्र चढ-उतार, अरुंद रस्ता, वाहून गेलेला मुरूम, वारंवार बंद पडणारी अवजड वाहने आणि अपुऱ्या सुरक्षाव्यवस्थेमुळे हा घाट धोकादायक बनला आहे. रस्त्याचे रुंदीकरण, संरक्षक कठडे आणि पर्यायी मार्गाची मागणी नागरिकांकडून वारंवार होत असली तरी अद्याप ठोस उपाययोजना झालेली नाही. त्यामुळे "आणखी किती अपघात झाल्यावर प्रशासन जागे होणार?" असा संतप्त सवाल वाहनचालक आणि स्थानिक नागरिक उपस्थित करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news