Param Bir Singh : माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांना भाजपचे संरक्षण – प्रवीण कुंटे पाटील

Param Bir Singh : माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांना भाजपचे संरक्षण – प्रवीण कुंटे पाटील

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : थेट गृहमंत्री यांच्यावर आरोप करणारे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग (Param Bir Singh) यांना क्लीनचिट आणि माजी मंत्री, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना ईडीचे समन्स हे दोन महत्त्वाचे विषय सध्या राज्यात पुढे आले आहेत. अनिल देशमुख यांच्यावर आरोप करून सरकार पाडण्याचे षडयंत्र केले गेले. आता परमवीर सिंग यांना क्लीनचिट देण्यात आल्याने भाजपचे त्यांना संरक्षण असून हे षड्यंत्र उघड झाले, आमचे आरोप सिद्ध झाले. भाजपविरोधात रान पेटविणाऱ्या जयंत पाटील यांचा आता आवाज बंद करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते प्रवीण कुंटे यांनी पत्रकार परिषदेत केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते हा प्रयत्न यशस्वी होऊ देणार नाहीत असा इशारा दिला.

परमवीर सिंग (Param Bir Singh) यांच्यावर 10 च्या वर गंभीर गुन्हे आहेत. परमवीर सिंग हे फरार होते. भाजप-सेना सरकार आल्यावर त्यांनी कॅटकडे अर्ज केला. कॅटच्या अपीलवर राज्य सरकारने उत्तर न दिल्याने कॅटने त्यांना क्लीनचिट दिली. दरम्यान, जयंत पाटील यांना दुसऱ्यांदा ईडीने समन्स दिला. आमचा, विरोधकांचा सातत्याने आवाज दाबण्याचा प्रयत्न आहे. मात्र ईडी असेल किंवा कुठलीही तपास यंत्रणा असेल तरी आमचा आवाज दाबू शकत नाही. पहिल्या समन्सच्या वेळी त्यांना महत्वाचे लग्न असल्याने ते गेले नाहीत, आता ते निश्चितच ईडीला सामोरे जाणार आहेत. त्यांचा कुठल्याही प्रकारणांशी संबंध नाही, हे त्यांनी स्वतः जाहीर केले आहे.

परमवीर सिंग यांच्यावर 10 गुन्हे दाखल आहेत, तरी त्यांना क्लीनचिट देणे म्हणजे भाजप त्यांना संरक्षण देत आहेत. सगळ्या तपास यंत्रणांचा गैरवापर भाजप करत आहे. भाजपच्या एकाही नेत्यावर ईडीची चौकशी नाही हाच या कार्यपद्धतीचा पुरावा आहे, असेही कुंटे म्हणाले.

अधिक वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news