वर्धा; पुढारी वृत्तसेवा : वर्धा जिल्ह्यात संततधार पावसाने चांगलाच कहर केला आहे. नद्यांना पूर आल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. अनेक कुटुंबांना सुरक्षितस्थळी नेण्यात आले. घरांचे, शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी (दि. १९) हिंगणघाट शहरासह तालुक्यातील कान्होली येथे भेट देत परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी उपमुख्यमंत्री फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी नुकसानग्रस्तांशी प्रत्यक्ष संवाद साधला.
यावेळी खासदार रामदास तडस, आमदार समीर कुणावार, माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार, मुख्य कार्यकारी अधिकारी सचिन ओम्बासे, पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर, उपविभागीय अधिकारी शिल्पा सोनाले, तहसीलदार सतीश मासाळ तसेच लोकप्रतिनिधी, प्रशासनातील अधिकारी उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सुरूवातीला महाकाली नगरी येथे भेट देत पाहणी केली. नंतर जी. बी. एम. एम. हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे नुकसानग्रस्तांशी त्यांनी संवाद साधून समस्या जाणून घेतल्या. यावेळी नुकसानग्रस्तांनी उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यापुढे समस्या मांडल्या. तसेच वणा नदीच्या तिरावर पूर पाहणी केली. उपमुख्यमंत्र्यांनी कान्होली येथेही भेट दिली. येथे आमदार रणजित कांबळे यांची उपस्थिती होती. उपमुख्यमंत्र्यांनी नागरिक, शेतकरी यांच्याशी संवाद साधत माहिती जाणून घेतली.
जिल्ह्यातील शेडगाव येथे नाल्याला मोठ्या प्रमाणावर पूर येऊन शेत पिकाचे नुकसान झाले. शेडगाव येथील नाल्याच्या पुराने गेलेल्या शेत पिकाची फडणवीस यांनी पाहणी केली. हिंगणघाट येथील महाकाली नगर येथे अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर लोकांच्या घरात पाणी शिरले होते. येथे त्यांनी पाहणी करुन नुकसानग्रस्तांच्या समस्या जाणून घेतल्या.
जिल्ह्यात दोन दिवस झालेल्या संततधार पावसामुळे वणा नदीला पूर येऊन शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले. शेतांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. दुबार पेरणीही खराब झाली असून लवकर पेरणी शक्य नसल्याचे सरपंचांनी सांगितले. यावेळी शेतकर्यांना योग्य मदत देण्याचा सरकारचा प्रयत्न राहील, असे फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
हेही वाचलंत का ?