अवघे २.५ सेकंद!…तर शिंजो आबे यांना वाचवता आले असते, जपान माजी पंतप्रधानांच्या सुरक्षेत आढळल्या गंभीर त्रुटी | पुढारी

अवघे २.५ सेकंद!...तर शिंजो आबे यांना वाचवता आले असते, जपान माजी पंतप्रधानांच्या सुरक्षेत आढळल्या गंभीर त्रुटी

नारा, जपान; पुढारी ऑनलाईन : जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे (Japan’s former prime minister Shinzo Abe) यांच्या हत्येबाबत महत्वाची माहिती समोर आली आहे. नारा शहरातील प्रचारसभेदरम्यान त्यांच्यावर गोळीबार झाला होता. त्यानंतर रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला होता. हल्लेखोराने आबे यांच्यावर दोन गोळ्या झाडल्या. त्यातील पहिली गोळी चुकली आणि दुसरी गोळी त्यांच्या छातीवर लागली. त्यामुळे ते गंभीर जखमी झाले. पहिली गोळी चुकल्यानंतर दुसरी गोळी लागण्याच्या आत २.५ सेकंदात अंगरक्षकांना शिंजो आबे यांना सुरक्षा कवच देता आले असते अथवा त्यांना गोळी लागण्यापासून वाचवता आले असते. असा निष्कर्ष आबे यांच्या हत्येबाबत आठ सुरक्षा तज्ज्ञांनी काढला आहे. सुरक्षा तज्ज्ञांनी आबे यांच्या हत्येच्या फुटेजची तपासणी केल्यानंतर हा निष्कर्ष काढला आहे. आबे यांच्या सुरक्षा व्यवस्थेत तज्ज्ञांना अनेक त्रुटी आढळून आल्या आहेत.

आबे यांच्यावर ८ जुलै रोजी प्रचारसभेत गोळीबार झाला होता. हल्ला झाल्यानंतर त्यांची प्रकृती गंभीर बनली होती. दरम्यान, उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. शिंजो आबे हे पश्चिम जपानमधील नारा शहरातील एका प्रचारसभेत संबोधित करत होते. भाषण करत असताना ते अचानक खाली कोसळले. त्यांच्या छातीत गोळी लागली होती. या हल्लाप्रकरणी पोलिसांनी नारा शहरातील ४१ वर्षीय यामागामी तेत्सुयाला याला हत्येचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली अटक केली आहे. त्याच्याकडून बंदूक जप्त करण्यात आली होती.

जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा यांच्यासह जपानी प्रशासनाने आबे यांच्या सुरक्षेत त्रुटी राहिल्याचे मान्य केले आहे. पोलिस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत. सुरक्षा तज्ज्ञांव्यतिरिक्त, रॉयटर्स वृत्तसंस्थेने ही घटना नेमकी कशी घडली याचा शोध घेतला आहे. घटनास्थळी असलेल्या सहा साक्षीदारांशी त्यांनी संवाद साधला आणि घटनास्थळावरील अनेक उपलब्ध असलेल्या व्हिडिओंचे परीक्षण केले. तसेच तेथे तैनात असलेल्या सुरक्षा उपायांचा आढावाही घेतला. एकूणच आबे यांच्या सुरक्षा व्यवस्थेत त्रुटी दिसून आल्या आहेत.

स्थानिक पोलिस दलांवर देखरेख करणार्‍या नॅशनल पोलिस एजन्सीने म्हटले आहे की, पोलिस त्यांची जबाबदारी पार पाडण्यात अपयशी ठरल्यामुळे आबे यांची हत्या झाली. सुरक्षा आणि संरक्षण उपायांचा आढावा घेण्यासाठी आणि अशा गंभीर घटना टाळण्यासाठी ठोस पावले उचलण्याच्या उद्देशाने एक पथक स्थापन करण्यात आले आहे.

Back to top button