पुढारी ऑनलाईन डेस्क : आई कुठे काय करतेचा सेट. वेळ रात्री नऊची. नाईट शिफ्ट असल्यामुळे सेटवर मोजकेच कलाकार उपस्थित होते. सीनसाठी प्रत्येक जण आपापल्या मेकरुपमध्ये तयार होत होते. संजनाही घाईघाईने सेटवर पोहोचली. तयार होण्यासाठी म्हणून मेकअपरुमध्ये जात असताना सेटवर अचानक लाईट्स बंद झाले. काही वेळाने पुन्हा सुरु झाले. सुरुवातीला पावसामुळे हे होतं असावं असं संजनाला वाटलं. मात्र हा खेळ काही मिनिटं असाच सुरु राहिला. तिच्या मनात शंकेची पाल चुकचुकली आणि तिने मदतीसाठी सेटवर प्रोडक्शनच्या लोकांना हाक मारायला सुरुवात केली. काही कळायच्या आत संजनासमोर एक विचित्र चेहऱ्याची व्यक्ती समोर आली. या व्यक्तीला पाहून संजनाचा भीतीने थरकाप उडाला आणि ती जोरजोरात ओरडायला लागली. तिचा आरडाओरडा पाहून सहकलाकार मदतीसाठी धावून आले.
संजनाप्रमाणेच सुख म्हणजे नक्की काय असतंच्या सेटवरही काहीसा असाच किस्सा घडला. शिर्के-पाटलांच्या जुन्या वाड्यात शूटिंग सुरु होतं. शालिनीचा सीन सुरु होता आणि अचानक शूटिंगदरम्यान तिला एक अनोळखी व्यक्ती दिसली. अंधारात नेमकं काय घडतंय हे सुरुवातीला तिला कळलं नाही. मात्र विचित्र चेहऱ्याच्या या व्यक्तीला पुन्हा पहाताच शालिनीच्या काळजाचा ठोका चुकला.
आई कुठे काय करते आणि सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेच्या सेटवर वावरणारी ही व्यक्ती म्हणजे भूत आहे हे एव्हाना स्पष्ट झालं होतं. हे भूत म्हणजे दुसरं तिसरं कुणी नसून एलिजाबेथचं आहे. नर्सच्या वेशात वावरणाऱ्या या एलिजाबेथला पाहून भीतीने थरकाप उडाल्याशिवाय रहात नाही. ही एलिजाबेथ नेमकी आहे कोण? कुठून आलीय? आणि तिचा हेतू काय आहे? याची उत्तरं एका चित्रपटात दडली आहेत.
हॉरर-थ्रीलर या चित्रपटात स्वप्नील जोशी आणि पूजा सावंत मुख्य भूमिकेत आहेत. ७ वर्षांचा मुलगा मंदारच्या वडिलांच्या भूमिकेत स्वप्नील जोशी दिसणार आहे. मंदारच्या उपचारादरम्यान हॉस्पिटलमध्ये घडणाऱ्या अनेक रहस्यमय घटना आणि त्याचा एलिजाबेथशी असणारा संबंध याचा उलगडा होणार आहे.