

Warora sand trader attack
चंद्रपूर : वरोरा : वरोरा तालुक्यातील बांबर्डा येथील वणा नदीच्या रेती घाटावर शिल्लक रकमेच्या वादातून रविवारी (दि. 1) सायंकाळी झालेल्या थरारक हल्ल्यात रेती व्यावसायिक भरत दयानंद नागपाल (रा. वर्धा) यांची हत्या करण्यात आली आहे. तलवारी, लाकडी दांडके व लोखंडी रॉडने करण्यात आलेल्या हल्ल्यानंतर हत्या करण्यात आली त्यानंतर त्यांना नदीत फेकण्यात आले. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
तक्रारदार अमोल मधुकर ठोंबरे (रा. निशानपुरा वार्ड, हिंगणघाट) यांनी वरोरा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत नमूद केले आहे की, बांबर्डा (ता. वरोरा) येथील वणा नदीचा रेती घाट 2025 मध्ये शासकीय लिलावातून (रा. भद्रावती, ह.मु. नागपूर) यांना मिळाला होता. त्यानंतर ठोंबरे व त्यांच्या भागीदारांनी सुमारे 2 कोटी 5 लाख रुपयांत हा घाट खरेदी केला. ही रक्कम स्टेट बँक ऑफ इंडियाच्या भद्रावती शाखेतील खात्यावर मे 2025 मध्ये वर्ग करण्यात आली.
घाटाचा कालावधी 9 जून 2026 पर्यंत असतानाही 25 जानेवारी 2026 रोजी गितेश सातपुते यांनी घाट परत घेण्याची विनंती केली आणि उर्वरित 98 लाख 64 हजार 621 रुपये 28 फेब्रुवारी 2026 पर्यंत परत करण्याचे मान्य केले होते. मात्र ठरलेल्या मुदतीनंतरही रक्कम न मिळाल्याने संबंधित भागीदारांनी 1 मार्चरोजी घाटावर जाऊन विचारणा करण्याचा निर्णय घेतला.
फिर्यादीनुसार, सायंकाळी सुमारे 6 वाजताच्या सुमारास तक्रारदार व त्यांचे सहकारी विविध वाहनांनी बामडी रेती घाटावर पोहोचले. त्यावेळी घाटावर रेती उपसा सुरू होता. काही वेळातच फोनवरून “तू घाटावर आहेस का? बघतो तुम्हाला,” असे सांगण्यात आले. त्यानंतर पोकलॅन्ड मशीन रस्त्यावर आडव्या लावून बाहेर जाण्याचे दोन्ही मार्ग बंद करण्यात आले.
थोड्याच वेळात काळ्या रंगाच्या महिंद्रा थार वाहनातून अमोल रामचंद्र कामडी, अक्षय विजयराव खडसे व इतर काही जण आले. त्यांच्या हातात तलवार, लाकडी दांडे व लोखंडी रॉड होते. त्यांच्यासोबत सौरभ दिलीपसिंह ठाकूर, सुनील नारायण झोरे, प्रफुल सूर्यभान उमाटे, अतुल पुरुषोत्तम मोटघरे आदी जणही आल्याचे तक्रारीत नमूद आहे.
हल्लेखोरांनी अचानक हल्ला चढवला. सौरभ ठाकूर याने तलवारीने तक्रारदारावर वार केला. त्यावेळी भरत नागपाल यांनी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्या डोक्यावर तलवारीने वार करण्यात आला. गंभीर जखमी झालेल्या नागपाल यांना मारहाण करून नदीत फेकण्यात आले.
नदीचे पात्र खोल असल्याने रक्त रक्तबंबाळ भरत नागपाल बुडू लागले. “वाचवा, वाचवा” असा आर्त आवाज देत असतानाही आरोपींनी मदत केली नाही. जिवाच्या भीतीने इतरांनी शेतात आश्रय घेतला. आरोपींनी चार वाहनांची तोडफोड करून डिझेल टाकून जाळण्याचाही प्रयत्न केला; मात्र पोलिस येत असल्याची चाहूल लागताच ते पसार झाले.
दरम्यान, 112 वर कॉल करून पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलीस पथक घटनास्थळी पोहोचल्यानंतर स्थानिक पोहणाऱ्या व्यक्तीच्या मदतीने भरत नागपाल यांना पाण्यातून बाहेर काढण्यात आले. त्यांना तातडीने हिंगणघाट उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले; मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
या प्रकरणी वरोरा पोलीस ठाण्यात अमोल रामचंद्र कामडी, अक्षय विजयराव खडसे, सौरभ दिलीपसिंह ठाकूर, सुनील नारायण झोरे, प्रफुल सूर्यभान उमाटे, अतुल पुरुषोत्तम मोटघरे व इतर तिघांविरुद्ध खून व खुनाचा प्रयत्न यांसह विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून आरोपींचा शोध घेतला जात आहे.
भरत दयानंद नागपाल यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी मोठी कारवाई करत 10 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून त्यापैकी 6 आरोपींना अटक करण्यात आली आहे. उर्वरित आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
घटनेनंतर वरोरा व हिंगणघाट परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. आर्थिक व्यवहाराच्या वादातून थेट प्राणघातक हल्ला झाल्याने व्यावसायिक वर्तुळात भीतीचे वातावरण आहे. पोलिसांनी अतिरिक्त बंदोबस्त ठेवला असून पुढील तपास सुरू आहे.