

Mul City Theft Case
चंद्रपूर : मुल शहरातून किराणा साहित्याने भरलेले पिकअप वाहन चोरी करून फरार झालेल्या टोळीला अवघ्या पाच दिवसांत जेरबंद करण्यात मुल पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाला मोठे यश मिळाले आहे. या कारवाईत तिघा आरोपींना मध्यप्रदेशातील छिंदवाडा जिल्ह्यातून अटक करण्यात आली असून चोरीस गेलेले पिकअप वाहन, किराणा साहित्य, खाद्य तेल व गुन्ह्यात वापरलेले दुसरे वाहन असा एकूण २२,७१,५२२ रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.
९ जानेवारीरोजी रात्री साडेआठच्या सुमारास फिर्यादी सुरेश सारडा यांच्या मालकीचे महिंद्रा बोलेरो पिकअप वाहन (क्र. एम.एच. ३४- बीझेड- ४४११) चालक रंजीत केशव बोबाटे (रा. चिंचाळा) यांनी नेहमीप्रमाणे चार्मोर्शी रोडवरील श्रीकृष्ण राईस मिलच्या बंद परिसरात उभे केले होते. सदर वाहनात मोठ्या प्रमाणावर किराणा साहित्य भरलेले होते. मात्र दुसऱ्या दिवशी सकाळी आठ वाजता चालक तेथे पोहोचला असता पिकअप वाहन दिसून आले नाही. अज्ञात चोरट्यांनी वाहनासह त्यातील किराणा साहित्य असा एकूण १३,८०,६३९ रुपयांचा माल चोरून नेल्याचे निष्पन्न झाले.
या प्रकरणी पोलीस स्टेशन मुल येथे अप.क्र. ०९/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम ३०३ (२) अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला. त्यानंतर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाने गोपनीय बातमीदार नेमून तसेच तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपासाची चक्रे वेगाने फिरवली. अवघ्या पाच दिवसांत गुन्ह्याचा छडा लावत पोलिसांनी मध्यप्रदेशातील छिंदवाडा जिल्ह्यातून तिघा आरोपींना ताब्यात घेतले.
अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये अनुज बबलु सोनी (वय २२), विनय क्रिपाल परतेती (वय २२) दोघेही रा. भाम्बाडा, ता. उमरेठ, जि. छिंदवाडा,आणि अंकित मुरद धुर्वे (वय २२) रा. राजगांव, ता. मुखेड, जि. छिंदवाडा (मध्यप्रदेश) यांचा समावेश आहे. पोलिसांनी आरोपींकडून चोरीस गेलेले महिंद्रा बोलेरो पिकअप वाहन (किंमत अंदाजे १० लाख रुपये), वाहनातील १५० बॉक्स खाद्य तेल (किंमत २,४१,०२६ रुपये), इतर किराणा साहित्य (३०,४९६ रुपये) तसेच गुन्ह्यात वापरलेले दुसरे वाहन (क्र. एम.एच. ४९- बीझेड- ०२३६, किंमत १० लाख रुपये) असा एकूण २२,७१,५२२ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
ही कामगिरी पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, उपविभागीय पोलीस अधिकारी सत्यजित आमले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विजय राठोड यांच्या नेतृत्वात पार पडली. या कारवाईत सपोनि सुबोध वंजारी, पोहवा भोजराज मुंडरे, नापोअं चिमाजी देवकते, पोअं नरेश कोडापे, दिलीप आदे, शंकर बोरसरे, संदीप चुदरी तसेच पोलीस स्टेशन मुल व सायबर पोलीस स्टेशन चंद्रपूर येथील अधिकारी व अंमलदारांनी सक्रिय सहभाग घेतला.