

chandrapur Roshan Kule kidney case
चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड तालुक्यातील रोशन कुळे किडनी विक्री प्रकरणात स्वतःला “डॉक्टर कृष्णा” म्हणून ओळख देणारा मुख्य आरोपी प्रत्यक्षात डॉक्टर नसून इंजिनिअर असल्याचा खळबळजनक खुलासा झाला आहे. आरोपीचे खरे नाव रामकृष्ण मल्लेश सुंचु, मूळ रहिवासी सोलापूर असल्याची माहिती समोर आली असून, त्याने आंतरराष्ट्रीय किडनी तस्करीचे मोठे रॅकेट चालविल्याचे तपासात उघड झाले आहे. या प्रकरणात चंद्रपूर पोलिसांच्या एसआयटी पथकाने कृष्णाला अटक केलेल्या कारवाईमुळे संपूर्ण देशभरातील किडनी रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड तालुक्यातील शेतकरी रोशन कुळे याने सावकारांच्या जाचाला कंटाळून किडनी विकण्याचा निर्णय घेतल्यानंतर ब्रम्हपुरी पोलिसांत तक्रार दाखल केली. या तक्रारीतून सुरू झालेल्या तपासात स्वतःला डॉक्टर भासवणाऱ्या एका इंजिनिअरने परदेशात किडनी प्रत्यारोपणाचे रॅकेट उभारल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.
ब्रम्हपुरी पोलीस स्टेशनमध्ये दाखल अपराध क्रमांक ६५४/२०२५ अंतर्गत भादंवि कलम ३८७, ३४२, २९४, ५०६, १२०(ब), ३२६ तसेच महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम २०१४ चे कलम ३९, ४४ आणि The Transplantation of Human Organs and Tissues Act, 1994 चे कलम १८ व १९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी तातडीने विशेष तपास पथक (SIT) स्थापन केले. अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झालेल्या तपासात प्रथम पाच सावकारांना अटक करण्यात आली.
तपास अधिक खोलात गेल्यानंतर “डॉक्टर कृष्णा” नावाचा व्यक्ती या संपूर्ण प्रकरणाचा मास्टरमाइंड असल्याचे निष्पन्न झाले. पोलिस तपासात उघड झाले की, आरोपीचे खरे नाव रामकृष्ण मल्लेश सुंचु असून तो पेशाने इंजिनिअर आहे, डॉक्टर नसून डॉक्टर असल्याचा बनाव त्याने केला होता.
पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी दिलेल्या माहितीनुसार, रामकृष्ण सुंचु हा व्यवसाय 6करीत होता. त्याचा व्यवसाय बुडाल्याने तो मोठ्या आर्थिक संकटात सापडला होता. या संकटातून बाहेर पडण्यासाठी त्याने स्वतःची किडनी विकण्याचा निर्णय घेतला. यासाठी त्याने सोशल मीडियावर किडनी विक्रीविषयी माहिती शोधली आणि एका किडनी डोनर कम्युनिटीच्या संपर्कात आला.
यानंतर तो कंबोडियाला जाऊन स्वतःची किडनी विकून आला, ही बाब अत्यंत खळबळजनक असल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे.
कंबोडियात स्वतःची किडनी विकल्यानंतर रामकृष्ण सुंचु याने एजंटची भूमिका स्वीकारली. त्याने स्वतःला डॉक्टर असल्याचे भासवू लागून, आर्थिक अडचणीत सापडलेल्या गरजू, पीडित व्यक्तींचा शोध घेण्यास सुरुवात केली. सोशल मीडियाच्या माध्यमातून आणि किडनी डोनर कम्युनिटीच्या जाळ्याचा वापर करून त्याने अनेक लोकांना आपल्या तावडीत पकडले. आतापर्यंत त्याने किमान १२ लोकांना कंबोडियातील Preah Ket Mealea Hospital, Phnom Penh येथे नेऊन किडनी प्रत्यारोपण केल्याचे तपासात उघड झाले आहे.
विशेष म्हणजे, एका किडनीमागे त्याला लाखो रुपयांचे कमिशन मिळत असल्याने त्याने हा बेकायदेशीर व्यवसाय स्वीकारल्याचे समोर आले आहे.
नागभीड तालुक्यातील शेतकरी रोशन कुडे याची आरोपीसोबत पहिली व शेवटची भेट कोलकत्ता विमानतळावर झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यानंतरच कुडे याला किडनी विक्रीचा मार्ग सापडला. त्यामुळेच कुडे यांनी किडनी विकली त्यानंतर ब्रम्हपुरी पोलिसांत तक्रार दाखल केल्यामुळे संपूर्ण आंतरराष्ट्रीय रॅकेटचा पर्दाफाश झाला.
चंद्रपूर पोलिसांनी तपासाचा रोख किडनी रॅकेटकडे वळवताच आरोपी रामकृष्ण सुंचु अलर्ट झाला होता. मात्र, त्याआधीच एसआयटी व क्राईम ब्रँचच्या विशेष पथकाने सोलापूर येथून त्याला अटक केली. सोशल मीडिया ट्रॅकिंग, तांत्रिक विश्लेषण व गोपनीय माहितीच्या आधारे ही कारवाई यशस्वी करण्यात आली.
या प्रकरणातून आंतरराष्ट्रीय किडनी तस्करी रॅकेट उघड झाले असून, यात आणखी अनेक मोठ्या आरोपींचा सहभाग असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. सध्या कसून चौकशी सुरू असून, लवकरच मोठी कारवाई होणार असल्याचे संकेत चंद्रपूर पोलिसांनी दिले आहेत.