Chandrapur kidney Racket | किडनी विक्री प्रकरणाचा तपास वेगात : अप्पर पोलीस अधीक्षकांच्या नेतृत्वात विशेष तपास पथक स्थापन

डॉक्टर कृष्णा मुख्य सूत्रधार असल्याचे स्पष्ट ; कोलकात्याकडे पोलिस पथक रवाना होणार
Chandrapur kidney Racket |
Chandrapur kidney Racket | किडनी विक्री प्रकरणाचा तपास वेगात :
Published on
Updated on
Summary
  • आंतरराष्ट्रीय किडनी रॅकेटचे धागेदोरे उघड होण्याची शक्यता

  • पथकात आठ पोलीस अधिकारी तसेच सायबर व संगणक तज्ज्ञांचा समावेश

  • संबंधित शेतकऱ्याला कंबोडिया येथे नेण्यात आले

  • सुमारे आठ लाख रुपयांत किडनीची विक्री

  • नाशिक जिल्ह्यातील एका युवकाने विमानतळावरून पळ काढला

चंद्रपूर : नागभीड तालुक्यात उघडकीस आलेल्या अवैध सावकारी आणि किडनी विक्रीच्या धक्कादायक प्रकरणाने आता गंभीर आंतरराष्ट्रीय स्वरूप घेतले असून, या प्रकरणाच्या सखोल तपासासाठी चंद्रपूर पोलिसांनी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन केले आहे. अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या नेतृत्वाखालील या पथकात आठ पोलीस अधिकारी तसेच सायबर व संगणक तज्ज्ञांचा समावेश करण्यात आला आहे.नागभीड अवैध सावकारी प्रकरणाच्या तपासात पुढे आलेल्या किडनी विक्रीच्या गंभीर बाबींच्या अनुषंगाने पोलिसांनी तपासाला नवे वळण दिले आहे.

तपासादरम्यान किडनी विक्री प्रकरणातील मुख्य सूत्रधार म्हणून डॉक्टर कृष्णा तसेच अन्य दोघांची भूमिका स्पष्टपणे समोर आल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. या तिघांच्या अटकेसाठी चंद्रपूर पोलिसांचे विशेष पथक लवकरच कोलकात्याकडे रवाना होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

तपासात असे उघड झाले आहे की, डॉक्टर कृष्णा आणि त्यांच्या काही सहकाऱ्यांच्या संपर्कातून हा प्रकार प्रथम कोलकात्यापर्यंत पोहोचला. तेथून पुढे संबंधित शेतकऱ्याला कंबोडिया येथे नेण्यात आले आणि सुमारे आठ लाख रुपयांत किडनीची विक्री करण्यात आली. विशेष म्हणजे, या प्रवासात रोशन कुळे यांच्यासोबत आणखी पाच युवक होते. त्यापैकी एक युवक उत्तर प्रदेशातील, दुसरा नाशिक जिल्ह्यातील तर उर्वरित तीन युवक इतर राज्यांतील असल्याची माहिती पुढे आली आहे.

या सर्व युवकांना कंबोडिया येथे पाठवण्यासाठी कोलकाता विमानतळावर आणण्यात आले होते. इमिग्रेशन काउंटरवर त्यांना नवीन कपडे देण्यात आले तसेच प्रत्येकी ३०० अमेरिकन डॉलर देण्यात आले. मात्र ३०० डॉलर हातात पडताच नाशिक जिल्ह्यातील एका युवकाचे मनपरिवर्तन झाले आणि त्याने विमानतळावरून पळ काढल्याची खळबळजनक बाब तपासात उघड झाली आहे.

दरम्यान, पीडित शेतकरी कुळे यांच्या मोबाईलचा कॉल डिटेल रेकॉर्ड (सीडीआर) अहवाल पोलिसांच्या हाती लागला असून, त्यातून किडनी तस्करी रॅकेटमध्ये सहभागी असलेल्या आणखी दोन जणांची ओळख पटली आहे. तसेच या प्रकरणाशी संबंधित काही महत्त्वाची छायाचित्रेही पोलिसांनी ताब्यात घेतली आहेत.

डॉक्टर कृष्णा पोलिसांच्या ताब्यात आल्यानंतर या आंतरराष्ट्रीय किडनी तस्करी रॅकेटचे धागेदोरे नेमके कुठपर्यंत पोहोचले आहेत, याचा संपूर्ण उलगडा होण्याची शक्यता आहे. नागभीड अवैध सावकारी प्रकरणातून सुरू झालेल्या या तपासामुळे आता मानवी तस्करी व अवयव तस्करीसारख्या गंभीर गुन्ह्यांवर मोठा प्रकाश पडण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news