

Chandrapur Drug Trafficking Gang Arrested
चंद्रपूर: चंद्रपूर शहरात अंमली पदार्थांची वाढती तस्करी ही पोलिसांसमोर मोठी डोकेदुखी ठरत आहे. विशेषतः युवकांमध्ये वाढत चाललेल्या अंमली पदार्थ (एम.डी.) सारख्या जीवघेण्या ड्रग्सच्या वापरामुळे समाजात गंभीर परिणाम दिसून येत आहेत. अशा परिस्थितीत स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर यांनी केलेली धाडसी कारवाई ही उल्लेखनीय ठरली आहे. गुप्त माहितीच्या आधारे रचलेल्या सापळ्यात पोलिसांनी दोन आरोपींना अटक करून लाखोंच्या किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
चंद्रपूर शहरातील रामनगर पोलीस स्टेशन हद्दीत अमलीpपदार्थ ( एम.डी.) नावाचा प्रतिबंधित अंमली पदार्थ विक्रीसाठी वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली. त्या माहितीच्या आधारे पोलीस पथकाने कारवाई करत दोन आरोपींना ताब्यात घेतले असून एकूण ६ लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रचलेल्या सापळ्यात राहुल अनिल पवार (वय २८, रा. एमईएल कॉलनी, चंद्रपूर) आणि चिनु महेश गुप्ता (वय १८, रा. महाकाली कॉलरी, चंद्रपूर) हे दोघे आरोपी अटक करण्यात आले. या कारवाईदरम्यान त्यांच्याकडून ५ ग्रॅम Mephedrone ड्रग्स, वाहन, मोबाईल इत्यादी एकूण ६,४०,००० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
या प्रकरणात अजून एक आरोपी आकाश गुप्ता (रा. महाकाली कॉलरी, चंद्रपूर) फरार असून त्याचा शोध सुरू आहे. याप्रकरणी रामनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा क्रमांक ६०४/२०२५ अंतर्गत एन.डी.पी.एस. अॅक्ट कलम ८(क), २२(ब), २९ अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन व अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वात पार पडली. कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक कॉक्रेडवार, बलराम झाडोकार, संतोष निंभोरकर, सर्वेश बेलसरे, तसेच पोलीस अंमलदार संतोष येलपुलवार, दिनेश अराडे, नितीन रायपुरे, सचिन गुरनुले, गणेश मोहुर्ले, दिपक डोंगरे, मिलींद जांभुळे, शंशाक बदामवार, सुमित बरडे आदींनी सहभाग घेतला.