

Roshan Kule Case
चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड तालुक्यातील मिंथूर गावातील तरुण शेतकरी रोशन शिवदास कुळे (वय ३६) यांना सावकारी कर्ज व कथित अवयव तस्करी रॅकेटमुळे आलेल्या संकटानंतर आता त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी शासन आणि प्रशासनाकडून युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. सावकारांनी बळकावलेली शेती पुन्हा त्यांच्या नावावर मिळवून देणे, गहाण ठेवलेले सोने परत मिळवून देणे तसेच दोन ट्रॅक्टर आणि कर्ज परतफेडीत गेलेली रोख रक्कम कायदेशीर मार्गाने परत देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. आज जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांनी महिनाभरानंतर आज शुक्रवारी आपल्या लवाजम्यासह भेट दिली.
मुख्यमंत्री स्तरावरून गंभीर दखल
किडनी विकावी लागल्याचा आणि सावकारी जाचाचा प्रकार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत पोहोचल्यानंतर त्यांनी तातडीने पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांच्याशी सविस्तर चर्चा केली. तसेच जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांना या प्रकरणाची गंभीर व सखोल चौकशी करण्याचे निर्देश दिले. यानंतर या प्रकरणाच्या तपासासाठी SIT (विशेष तपास पथक) स्थापन करण्यात आले आहे.
मालमत्ता परत मिळवून देण्याची प्रक्रिया सुरू
या प्रकरणातील सावकारांनी रोशन यांच्याकडून कर्ज परतफेडीच्या नावाखाली घेतलेली मालमत्ता आणि रक्कम परत मिळवून देण्यासाठी शासनाकडून पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे. बळजबरीने विक्री/बळकावलेली ४ एकर शेती रोशन कुळे यांच्या नावावर परत मिळवून देण्याचे काम सुरू असून गहाण ठेवलेले सोने परत मिळवून देण्यासाठी कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे. सावकारांचे बँक खाते फ्रीझ/स्विच करण्यात आले असून त्यात १६ लाख रुपये जमा आहेत, ती रक्कम कायदेशीररित्या रोशन यांना परत देण्याचे प्रयत्न सुरू असून कर्जफेडीसाठी घेतलेले दोन्ही ट्रॅक्टर कोर्टाच्या माध्यमातून कायदेशीररित्या परत मिळवून देण्याची कार्यवाही सुरू असल्याची माहिती आमदार भांगडिया यांनी यावेळी दिली.
आज शुक्रवारी पालकमंत्री डॉ. अशोक उईके, आमदार कीर्ती कुमार उर्फ बंटी भांगडिया, जिल्हाधिकारी डॉ. विनय गौडा, अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, जिल्हा उपनिबंधक आणि अन्य वरिष्ठ अधिकारी यांनी मिंथूर गावात जाऊन रोशन कुळे व त्यांच्या कुटुंबीयांची प्रत्यक्ष भेट घेतली आणि आस्थेने विचारपूस केली.
भेटीदरम्यान आमदार किर्तीकुमार उर्फ बंटी भांगडिया यांनी या प्रकरणात राजकारण न करण्याचे आवाहन केले. ते म्हणाले, रोशन कुळे हे एक तरुण शेतकरी आहेत. त्यांच्यावर आलेली वेळ कुणावरही येता कामा नये. राज्य सरकार व प्रशासन त्यांना १००% न्याय देण्याचा प्रयत्न करत आहे. या गंभीर प्रकरणात कुणीही राजकारण करू नये, ही सर्व पक्ष व नेत्यांना हात जोडून विनंती त्यांनी केली. त्यांनी बोलताना वारंवार विरोधकांना टोमणे मारू त्यांनी अधिवेशनात हा मुद्दा मांडला नाही. सरकारच्या लक्षात आणून दिला नाही. असे सांगून आम्हीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनात कारवाई व्हावी या करिता प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले.
प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी या प्रकरणाची सुरुवातीला दखल घेत रोशन यांच्या गावी भेट दिली होती आणि त्यांच्यावर झालेल्या अन्यायाला न्याय मिळावा यासाठी आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यांनी पालकमंत्री, खासदार आमदार व अधिकारी यांनी एवढ्या मोठ्या प्रकरणानंतर रोशनच्या गावी न पोहचल्याने चांगलाच संताप व्यक्त केला होता.
३ जानेवारी २०२६ रोजी मिंथूर ते नागभीड तहसील कार्यालयापर्यंत १० किमी लाँग मार्च काढून हजारो शेतकऱ्यांसह अल्टिमेटम दिला होता. त्यानंतर आता प्रशासन सक्रिय झाले असून वरिष्ठ अधिकारी थेट गावात पोहोचल्याचे चित्र आज शुक्रवारी पहायला मिळाले.
गाव भेटीनंतर पालकमंत्री माध्यमांसमोर बोलले नाही, त्यामुळे शासन–प्रशासनाची अधिकृत भूमिका आमदार बंटी भांगडिया यांनीच मांडली. यावेळी त्यांनी विरोधकांवरही अप्रत्यक्ष टोले लगावले. मात्र शासनाचा मुख्य उद्देश तपास आणि न्याय प्रक्रिया हाच असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
रोशन कुळे यांनी स्वतःवर झालेल्या सावकारी छळ आणि किडनी विक्री संदर्भातील व्यथा माध्यमांसमोर मांडल्यानंतर आता सावकारी गुन्ह्यातील ६ आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. किडनी व्यवहाराचा भाग स्वतंत्र वैद्यकीय, कायदेशीर चौकशीत असून, अहवालानंतर पुढील कारवाई होणार आहे.
शेती, सोने, ट्रॅक्टर आणि रोख १६ लाख रुपये कायदेशीर मार्गाने परत मिळवून देण्याचा शासनाचा प्रयत्न सुरू असल्याचा विश्वास त्यांनी कुळे यांना दिला.