

चंद्रपूर : नागभीड तालुक्यातील मींथुर येथील शेतकरी रोशन कुळे (वय ३६) याने सावकारांच्या व्याजाच्या जाचाला कंटाळून किडनी विक्रीसंदर्भात दाखल केलेल्या तक्रारीनंतर सुरू झालेल्या तपासात, चंद्रपूर पोलिसांना अवयव तस्करीच्या आंतरराष्ट्रीय रॅकेटचे भारतातील मोठे कनेक्शन उघड करण्यात यश मिळाले आहे. या प्रकरणात सोलापूरचा रामकृष्ण मल्लेश सुंचु उर्फ डॉ. कृष्णा आणि पंजाबच्या मोहालीचा हिमांशु भारद्वाज या दोघांना आधीच अटक करण्यात आली होती. पुढील तांत्रिक तपास व विश्लेषणातून हे किडनी प्रत्यारोपण रॅकेट दिल्ली आणि तामिळनाडूतील नामांकित रुग्णालये व डॉक्टरांपर्यंत पोहोचल्याचे स्पष्ट झाले आहे.
नागभीड तालुक्यातील मिंथूर येथील रोशन कुळे याच्या तक्रारीवरून ब्रम्हपुरी पोलीस ठाण्यात अपराध क्र. ६५४/२०२५ अंतर्गत खंडणी, शिवीगाळ, धमकी, गंभीर दुखापत तसेच महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम व मानवी अवयव प्रत्यारोपण कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणामध्ये सहा पैकी पाच सावकारांना अटक करण्यात आली आहे. गुन्ह्याचे गांभीर्य पाहता पोलिसांनी तातडीने विशेष तपास पथक (SIT) स्थापन करत सावकारांसह किडनी दलाल साखळीचा तपास सुरू केला — आणि याच तपासाने आता आंतरराष्ट्रीय रॅकेटच्या भारतीय तळापर्यंत धडक दिली आहे.
तपासात निष्पन्न झालेल्या माहितीनुसार, आरोपी हिमांशु भारद्वाज याने जुलै २०२२ मध्ये आर्थिक अडचणींमुळे स्वतःची किडनी विकली होती. ही प्रत्यारोपण प्रक्रिया तामिळनाडूतील त्रिची येथील स्टॉर किम्स हॉस्पिटलमध्ये, रुग्णालयाचे संचालक डॉ. राजरत्नम गोविंदस्वामी, दिल्लीतील डॉ. रविंद्रपाल सिंग आणि रामकृष्ण सुंचु यांच्या संगनमताने अवैधरित्या पार पडली असल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, किडनी घेणाऱ्या रुग्णाकडून ५० ते ८० लाख रुपये आकारले जात होते. त्यातील १० लाख रुपये डॉ. रविंद्रपाल सिंग (दिल्ली) यास, २० लाख रुपये स्टॉर किम्स हॉस्पिटलला सर्जरी व रुग्णसेवा उपलब्ध करून देण्यासाठी आणि २० लाख रुपये रामकृष्ण सुंचु व इतर एजंटना कमिशन म्हणून, तर किडनी देणाऱ्या व्यक्तीस फक्त ५ ते ८ लाख रुपये दिले जात होते अशी खळबळ जनक माहिती तपासात उघड झाली आहे.
किडनी दाते संकटात असताना त्यांचा गैरफायदा घेऊन हा व्यवहार होत असल्याचे तपासात दिसून आले आहे. विशेष म्हणजे, आतापर्यंत १६ जणांच्या किडन्या विकल्या गेल्याची प्राथमिक नोंद समोर आली असून प्रत्यक्ष रॅकेट यापेक्षा कितीतरी मोठ्या पातळीवर कार्यरत असल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
या रॅकेटचा पुढील छडा लावण्यासाठी चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेचे (LCB) एक पथक त्रिची (तामिळनाडू) येथे पोहोचले असून, डॉ. राजरत्नम गोविंदस्वामी यांचा शोध घेऊन त्यांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न सुरू आहे.
दरम्यान, LCB च्या दुसऱ्या पथकाने दिल्ली येथून डॉ. रविंद्रपाल सिंग यांना ताब्यात घेतले होते. त्यांना ट्रान्झिट रिमांडसाठी दिल्ली न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने २ जानेवारी २०२६ रोजी मुख्य न्यायदंडाधिकारी, चंद्रपूर यांच्यासमोर प्रत्यक्ष हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशानंतर पुढील तपास व कायदेशीर प्रक्रिया सुरू ठेवण्यात येणार आहे.
कंबोडियातील प्रत्यारोपण कनेक्शनच्या तक्रारीवरून सुरू झालेल्या तपासाला आता भारतातील मोठ्या वैद्यकीय अवयव घोटाळ्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे. चंद्रपूर पोलिसांच्या अथक तांत्रिक तपास, सोशल मीडिया ट्रॅकिंग आणि क्राईम ब्रँचच्या नियोजनबद्ध कारवाईमुळे भारतातील डॉक्टर, एजंट आणि रुग्णालयांचा सहभाग उघड झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणात अजूनही काही आरोपी फरार असून तपास वेगाने सुरू आहे. लवकरच मोठी कारवाई आणि आणखी अटकसत्र सुरू होण्याची शक्यता चंद्रपूर पोलिसांनी वर्तवली आहे.