

चंद्रपूर : नागभीड तालुक्यातील मिंथूर येथील रोशन कुळे या ३६ वर्षीय शेतकर्याला सावकरी कर्जापायी आपली किडनी विकावी लागली. या प्रकरणात अवैध सावकारीच्या गुन्ह्यात अटकेत असलेल्या ब्रम्हपुरी येथील सहा सावकारांनी दाखल केलेला जामिन अर्ज आज जिल्हा सत्र न्यायालयाने फेटाळून लावीत त्यांचा जामिन रद्द केला. त्यामुळे सहाही सावकारांची तुरुंगात रवानगी करण्यात आली.
नागभीड तालुक्यातील मिंथूर येथील रोशन कुळे या ३६ वर्षीय शेतकर्याला अवैद्य सावकरी कर्जापायी आपली किडनी विकावी लागली. मनिष पुरुषोत्तम घाटबांधे, किशोर राम बावणकुळे, लक्ष्मण पुंडलिक उरकुडे , प्रदीप राम बावणकुळे , संजय विठोबा बल्लारपुरे व सत्यवान रामरतन बोरकर सावकारांविरुद्ध ब्रम्हपुरी पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आले आहे.
या सहाही जणांना अटक करण्यात आली. त्या नंतर तुरूंगात रवानगी करण्यात आले होती. या सहा सावकारांनी जामिनासाठी जिल्हा न्यायालयात अर्ज सादर केला होता. त्यावर आज गुरुवारी झालेल्या सुनावणी दरम्यान न्यायालयाने सर्व सहाही आरोपींचा जामिन रद्द केला.
नागभीड तालुक्यातील मिंथुर (मिथुर) येथील ३६ वर्षीय मजूर रोशन शिवदास कुळे यांनी १६ डिसेंबर रोजी ब्रम्हपुरी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार, २ फेब्रुवारी २०२१ रोजी त्यांनी ब्रम्हपुरी येथील एका सावकाराकडून एक लाख रुपये व्याजाने घेतले होते. त्यापैकी १५ हजार रुपये ३१ मार्च २०२१ रोजी परत केले. मात्र उर्वरित ८५ हजार रुपये वेळेत न भरल्याने सावकाराने २० टक्के दराने व्याज व दररोज पाच हजार रुपये दंड आकारण्याची धमकी दिली. पैसे न दिल्यास घरातील मौल्यवान वस्तू उचलून नेण्याची धमकीही देण्यात आली. या दबावामुळे फिर्यादीने वेगवेगळ्या सावकारांकडून कर्ज घेतले. सावकारांना पैसे देण्यासाठी आतापर्यंत सुमारे ४८ लाख ५३ हजार रुपये दिल्याचे तक्रारीत नमूद आहे. आर्थिक विवंचनेमुळे फिर्यादी कंबोडिया येथे जाऊन स्वतःची किडनी विकली. सन २०२१ ते जून २०२३ या कालावधीत या सावकरांनी संगनमत करून अव्वाच्या सव्वा व्याजाची वसुली केली.