

Bramhapuri kidney case
चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड तालुक्यातील मींथुर येथील शेतकरी रोशन कुळे याने सावकारांच्या छळाला कंटाळून किडनी विकल्याची तक्रार दिल्यानंतर उघड झालेल्या किडनी विक्री प्रकरणात रोज धक्कादायक खुलासे समोर येत आहेत.
या प्रकरणाचा तपास करताना चंद्रपूर पोलिसांनी आधी सोलापूर येथील रामकृष्ण सुंचु उर्फ डॉ. कृष्णा याला अटक केली होती. त्यानेही स्वतःची किडनी कंबोडियात विकून नंतर या रॅकेटमध्ये दलाल म्हणून काम सुरू केल्याचे समोर आले होते. आता या साखळीतील आणखी एक महत्त्वाचा दुवा पंजाबच्या मोहाली येथील हिमांशु भारद्वाज असल्याचे निष्पन्न झाले असून, त्यालाही मोहालीतून अटक करण्यात आली आहे.
रोशन कुडे या शेतकऱ्याच्या तक्रारीनंतर सावकारांविरोधात सुरू झालेल्या तपासाला आंतरराष्ट्रीय किडनी तस्करीच्या रॅकेटकडे वळण मिळाले. याच तपासात आता पंजाबच्या मोहालीतील इंजिनिअर व व्यावसायिक हिमांशु भारद्वाज हा किडनी विकून रॅकेटमध्ये सहभागी झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
पोलिस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, हिमांशु भारद्वाज याने सिंगापूर येथे हॉटेल मॅनेजमेंटचे प्रशिक्षण घेतले आहे. भारतात परतल्यानंतर मोहालीतील परिचारिका (नर्स) असलेल्या एका युवतीवर त्याचे प्रेम जडले. तिच्यावर त्याने लाखो रुपयांची उधळपट्टी केली, तिला अमेरिकेत पर्यटनासाठीही पाठवले होते.
दरम्यान, हिमांशुसोबत नात्यात असतानाच त्या युवतीचे दुसऱ्याशी प्रेमसंबंध जुळले आणि तिने दुसऱ्याशी विवाह केला. तोपर्यंत प्रेयसीवरील खर्च आणि व्यवसायातील नुकसान भरून काढताना हिमांशु मोठ्या प्रमाणावर कर्जबाजारी झाला होता. तो मोहाली येथे टूर अँड ट्रॅव्हल्सचा व्यवसाय करीत होता, मात्र तोही बुडाल्याने आर्थिक संकट अधिक गडद झाले. या कर्जातून मुक्त होण्यासाठी हिमांशुने कंबोडियात जाऊन स्वतःची किडनी विकली आणि त्यानंतर तोही किडनी तस्करी रॅकेटमध्ये सक्रिय दलाल म्हणून काम करू लागला.
कंबोडियात किडनी विकणाऱ्या व्यक्तींचा केअर टेकर (Caretaker) म्हणून तो रुग्णांसोबत जात असे आणि एका किडनी प्रत्यारोपणामागे त्याला लाखोंचे कमिशन मिळत असल्याने त्याने हा अवैध ‘व्यवसाय’ सुरू ठेवला.
रोशन कुडे, रामकृष्ण सुंचु आणि हिमांशु भारद्वाज हे सर्व आरोपी फेसबुकवरील ‘किडनी डोनर कम्युनिटी’ ग्रुपच्या माध्यमातून किडनी विक्रीत सहभागी झाल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. आतापर्यंत १६ लोकांनी किडन्या विकल्याची नोंद पोलिस तपासात समोर आली असली, तरी हे रॅकेट यापेक्षा अधिक व्यापक आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर सक्रिय असल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
पोलीस कोठडी वाढ; तिसरा आरोपी फरार
पंजाब पोलिसांनी हिमांशु भारद्वाज याची पोलीस कोठडी २९ डिसेंबरपर्यंत वाढवली असून त्याच्याकडून रॅकेटसंदर्भात आणखी महत्त्वाची माहिती मिळण्याची शक्यता आहे. या प्रकरणातील तिसरा आरोपी अद्याप फरार असून तो पोलिसांच्या हाती लागलेला नाही.
चंद्रपूरचे अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनात एसआयटी व क्राईम ब्रँच पथक तपास करत असून सोशल मीडिया ट्रॅकिंग आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपींपर्यंत पोहोचण्यात पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. आंतरराष्ट्रीय किडनी तस्करी साखळीतील आणखी मोठे मास्टरमाइंड आणि सहभागी पुढील तपासात उघड होण्याची शक्यता असून, लवकरच मोठी कारवाई होईल, असे संकेत पोलिसांनी दिले आहेत.