Lok Sabha Election 2024 : मुनगंटीवारांचा नकार, भाजप कुणबी उमेदवाराच्या शोधात | पुढारी

Lok Sabha Election 2024 : मुनगंटीवारांचा नकार, भाजप कुणबी उमेदवाराच्या शोधात

चंद्रपूर; पुढारी वृत्तसेवा : चंद्रपूर-वणी-आर्णी मतदारसंघात २०१९ मध्ये प्रबळ कुणबी घटकामुळे मोठ्या फरकाने भारतीय जनता पार्टीला पराभव पत्करावा लागला. त्यामुळे भाजपाची स्थिती ‘दूध के जले, छाज भी फुंककर पिते है’ अशी झाली आहे. महाराष्ट्रातील भाजपच्या सहयोगी पक्षात जागावाटपाचा फॉर्म्युला अद्याप ठरला नाही. भाजपाने कॅबिनेट मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना ही जागा ‘पॉवरफूल मॅन’ म्हणून लढविण्यासाठी सूचित केले असले तरी, तूर्तास मुनगंटीवार यांनी नकार दिल्याने भाजपचा उमेदवार कोण? यावर चर्चा रंगू लागल्या आहेत.

भाजप नवीन उमेदवाराचे मुल्यांकन करण्यासाठी आपला वेळ घेत आहे. मजबूत सामाजिक पार्श्वभूमी असलेल्या उच्च शिक्षित कुणबी उमेदवाराला उभे करून शेवटच्या क्षणाला भाजप महाविकास आघाडीला शह देईल असे जाणकारांचे मत आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार बाळू उर्फ सुरेश धानोरकर यांनी भाजपचे बलाढ्य, चार वेळा खासदार आणि केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहिर यांचा ५४ हजाराहून अधिक मतांनी पराभव केला होता. २०१४ च्या तुलनेत २०१९ च्या निवडणुकीत काँग्रेसच्या मतांची टक्केवारी २१ टक्क्यांनी वाढली आहे. सर्व राजकीय विश्लेषक कुणबी घटकाला अहिर यांच्या पराभवाचे कारण मानतात. विजयी बाळू धानोरकर हे  कुणबी समाजातील होते, तर अहिर गवळी समाजातील होते. समाज प्रबल्यावर आधारित निवडणूक पहिल्यांदाच अनुभवायला आली. त्यामुळे भाजप ‘अबकी बार चार सौ पार’ करण्यासाठी  दमदार कुणबी उमेदवाराच्या शोधात आहे. काँग्रेसच्या मतांच्या २१ टक्के वाढीकडे लक्ष केंद्रित करून  उमेदवाराचा शोध घेत आहे.

माजी मंत्री हंसराज अहिर यांनी पुन्हा एकदा चंद्रपूरमधून भाजपच्या तिकिटासाठी दावा केला आहे. चंद्रपूरच्या जागेसाठी पालकमंत्री आणि विकासाचा उत्कृष्ट ट्रॅक रेकॉर्ड असलेले सहा वेळा आमदार सुधीर मुनगंटीवार यांना लोकसभा देण्याकडे पक्षाचा कल दिसून येत आहे. मात्र, मुनगंटीवार यांनी लोकसभेची निवडणूक लढवण्याची इच्छा अद्याप जाहीर केलेली नाही. पक्ष सांगेल ते करणार, अशी भूमिका त्यांनी घेतल्याने निरनिराळ्या चर्चेला पेव फुटले आहे.

कुणबी समाजाचे वर्चस्व (मतदारसंघात सुमारे ७ लाख मते) लक्षात घेता भाजपचे तिकीट नवख्या उमेदवाराच्या खिशात पडण्याची शक्यता आहे. माजी खासदार दिवंगत बाळू धानोरकर यांची पत्नी आ. प्रतिभा धानोरकर यांना काँग्रेसचे तिकीट जवळपास निश्चित झाल्याने भाजप त्यांचा मुकाबला कुणबी समाजाच्या उमेदवाराने करेल. ओबीसी कोट्यातील मराठा आरक्षणाला एकजुटीने विरोध केल्याने विदर्भातील सर्व कुणबी समाज पुन्हा एकत्र आला आहे, ही वस्तुस्थिती पक्षाच्या उमेदवार निवडीतही महत्त्वाची भूमिका बजावेल.

भाजपकडे सध्या माजी जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे आणि राष्ट्रवादी काँग्रेसला राम राम ठोकून नुकतेच पक्षात परतलेले ज्येष्ठ ओबीसी नेते डॉ. अशोक जिवतोडे, माजी आमदार संजय धोटे हे लोकप्रिय कुणबी चेहरे आहेत. यातील भोंगळे व धोटे यांच्या विरोधात अंतर्गत सर्व्हेक्षण जात असल्याने डॉ. जीवतोडे यांच्या नावावर भाजपाचे विचारमंथन सुरू आहे. डॉ जीवतोडे यांच्या शिक्षण संस्था, ओबीसी समाजासाठीही त्यांची जमेची बाजू आहे. यवतमाळ जिल्ह्यातील वणी तालुक्यातील वडगावचे रहिवासी असलेले उच्चशिक्षित डॉ. गजेंद्र आसुटकर यांनी पण भाजपकडे उमेदवारी मागितल्याने भाजप दोघांचे मूल्यमापन करीत आहे.

सध्या नागपूर येथील अभियांत्रिकी महाविद्यालयात प्राध्यापक आणि उपप्राचार्य म्हणून कार्यरत असलेले डॉ. आसुटकर नागपुरातील अखिल भारतीय धनोजे कुणबी समाजाचे अध्यक्षही आहेत. चंद्रपूर आणि यवतमाळ या दोन्ही जिल्ह्यात गेल्या २० वर्षांपासून शेतकरी, विद्यार्थी आणि दीनदुबळ्यांची सेवा करणारे सक्रिय सामाजिक कार्यकर्ते म्हणून त्यांची ओळख आहे. डॉ. आसुटकर यांना धनोजे कुणबी समाजातर्फे चंद्रपूर आणि नागपूर येथे समाज भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. सूत्राने दिलेल्या माहितीनुसार त्यांच्या नावाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा पाठिंबा असल्याचा काही भाजप नेत्यांचा दावा आहे. भाजपच्या एका मोठ्या नेत्याने डॉ. आसुटकर यांच्या उमेदवारीला पाठिंबा दिला असून, चंद्रपूर लोकसभेसाठी त्यांच्या नावाचा विचार करण्याची विनंती करणारे पत्रही त्यांनी भाजप प्रदेशाध्यक्षांना पाठवले आहे. डॉ. आसुटकर यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याचे समजते. त्यामुळे भाजपचा उमेदवार जिवतोडे की आसुटकर यावर चर्चा सुरू आहे.

हेही वाचा : 

Back to top button