मुंबई : पुढारी वृत्तसेवा ; मुंबई महानगरपालिकेचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या कोस्टल रोडची एक मार्गिका खुली करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकल्पाची मूळ कल्पना मांडणार्या आणि हा मार्ग उभारण्याची जबाबदारी महापालिकेवर टाकणार्या ठाकरे पिता-पुत्रांवर दुहेरी हल्ला चढवला. कोस्टल रोडचे काम सुरू असताना इथल्या आमदारांकडून वसुली होत होती, असा आरोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला.
वांद्रे सी-लिंक ते मरीन ड्राईव्हपर्यंत बांधण्यात येणार्या सुमारे 10.5 किलोमीटर लांबीच्या कोस्टल रोडची वरळी ते मरीन ड्राईव्ह दक्षिण वाहिनी मार्गिकेचे सोमवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, पालकमंत्री दीपक केसरकर व मंगल प्रभात लोढा, खासदार, आमदार, पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल, अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे, अश्विनी जोशी, सुधाकर शिंदे व अन्य वरिष्ठ अधिकारी, एल अँड टी चे वरिष्ठ अधिकारी, अभियंते उपस्थित होते.
फडणवीस म्हणाले, काही लोक फेसबुक, इन्स्टाग्राम आणि फेसबुक लाईव्ह करुन कोस्टल रोड प्रकल्पाचे श्रेय घेण्याचा प्रयत्न करत आहे. मला या व्यासपीठावरून काही सांगायचे नव्हते, पण पूर्वी कोस्टल रोडच्या कामात कशाप्रकारे वसुली सुरु होती याच्या अनेक तक्रारी कंत्राटदाराकडूनच माझ्याकडे येत होत्या. कुठे खोदकाम करायचे असेल अथवा ट्रक न्यायचा झाला तरी वसुली केली जात होती. त्यावेळी या भागात कोण आमदार होते, हे सगळ्यांना माहिती आहे. इथे अजित गुलाबचंद आणि एल अँड टी चे देसाई उपस्थित आहेत. हे दोघे कधीही बोलणार नाहीत. कारण या दोघांना जन्मभर काम करायचे आहे. मी त्यावेळी विरोधी पक्षनेता होतो. अजित गुलाबचंद आणि देसाई साहेबांचे काही अधिकारी तेव्हा माझ्याकडे सातत्याने येत होते. कोस्टल रोडमध्ये आमच्याच लोकांना विशिष्ट रेटने काम द्या, असे सांगितले जात होते असा आरोपही फडणवीस यांनी केला.
कोस्टल रोडचे ठाकरे कुटुंब श्रेय घेत आहेत. मुंबई महानगरपालिकेच्या दोन निवडणुकाही उद्धव ठाकरे यांनी कोस्टल रोड प्रकल्पावर लढल्या. पण कोस्टल रोडची फाईल पुढे सरकलीच नाही. कोस्टल रोड बांधताना नेहमी सीआरझेडचे नियम आडवे येत होते. मागच्या सरकारमधले दिल्लीला जाऊन हात हलवत परत यायचे. मी सत्तेत असताना पुढाकार घेतला. कोस्टल रोड करताना पर्यावरणाची हानी होणार नाही याची काळजी आम्ही घेऊ असा शब्दही आम्ही केंद्राला दिला. तत्कालीन पर्यावरण मंत्री अनिल माधव दवे आजारी असताना देखील एका बैठकीसाठी आले. त्यांच्यामुळे या कामाला पर्यावरण विभागाची परवानगी मिळाली. पण तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपणास भूमिपूजनालाही बोलावले नाही, अशी खंतही फडणवीस यांनी व्यक्त केली.
मुंबईतील प्रवासादरम्यान वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी मेट्रो, अटल सेतू, जमिनीखालून रस्ते असे प्रकल्प सुरू आहेत. या प्रकल्पांदरम्यान अडचणी येतात. परंतु सकारात्मक भूमिका ठेवली की त्यातून मार्ग निघतात, असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला. मुंबईची प्रदूषित शहर ही ओळख बदलून वेगवान प्रवासासाठी शासन पावले उचलत आहे. वाहतूक कोंडी कमी करून मुंबईकरांचे आरोग्य चांगले राहावे यासाठी हरीत पट्टे तयार करण्यात येत आहेत. त्यादृष्टीने सध्या सुरू असलेले विविध प्रकल्प मुंबईच्या वैभवात भर घालणारे आणि सर्वसामान्यांसाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहेत भविष्यातील सुखकर प्रवासासाठी मुंबईकरांनी आता होत असलेल्या त्रासात सहनशीलता दाखविल्याबद्दल पवार यांनी मुंबईकरांचे आभारही मानले.
कोस्टल रोड प्रकल्प मार्गी लावण्यात महत्त्वाची भूमिका बजावणार्या पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल व अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे यांचे फडणवीस यांनी कौतुक केले. राज्यात सत्ताबदल झाल्यानंतर चहल यांनी या प्रकल्पात गो गेटरची भूमिका बजावली.