चंद्रपूर : निवडणुकीत दोनदा झालेल्या पराभवानंतर अखेर पोटनिवडणुकीत विजय | पुढारी

चंद्रपूर : निवडणुकीत दोनदा झालेल्या पराभवानंतर अखेर पोटनिवडणुकीत विजय

चंद्रपूर; पुढारी वृत्तसेवा : दोनदा झालेल्या मागील पंचवार्षिक निवडणुकीत फक्त एका मतांनी पराभव पत्कारलेल्या एका सदस्याने यावेळी पोटनिवडणुकीत नऊ मतांनी विजय मिळविला आहे. ग्रामपंचायत सदस्यांच्या निधनानंतर सहा महिन्याने चिमूर तालुक्यातील वडसी येथे रविवारी (दि.५) ही पोटनिवडणूक पार पडली. या पोटनिवडणुकीत आज (दि.६) झालेल्या मतमोजणीत नऊ मतांनी विवेक रामटेके विजयी झाले.

वडसी येथील एका सदस्याचे निधन झाल्याने ती जागा रिक्त झाली होती. त्यामुळे दोनदा पंचवार्षिक निवडणुकीत फक्त एका मताने पराभव झालेले विवेक रामटेक हे ह्या जागेवर तिसऱ्यांदा उभे झाले होते. त्यामुळे ह्या पोटनिवडणुकीकडे अख्या तालुक्याचे लक्ष लागले होते. वडसी येथील रहिवासी असलेले विवेक रामटेके हे मागील दोन ग्रामपंचायत पंचवार्षिक निवडणुकीत उभे राहिले परंतु त्याचे प्रतिस्पर्धी भास्कर मेश्राम यांनी त्यांचा दोन्ही निवडणुकीत फक्त एका मतांनी पराभव केला होता. त्यानंतर भास्कर मेश्राम यांच्या निधनाने वार्ड नंबर ३ मधील सदस्य जागा रिक्त झाली. त्यानंतर सहा महिन्यानंतर पोटनिवडणुक रविवारी(दि.५) पार पडली. विवेक रामटेके हे तिसऱ्यांदा ही निवडणूक लढवत असताना भास्कर मेश्राम यांचे मोठे बंधू भक्तदास मेश्राम हे प्रतिस्पर्धी म्हणून उभे राहिले. दोघांसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची ठरली होती. आज (दि.६) झालेल्या मतमोजणीत विवेक रामटेके यांनी घवघवीत तिसऱ्यावेळी विजय मिळविला. या वार्डात १९५ मतदान होते . विवेक रामटेके यांना ८६ तर भक्तदास मेश्राम यांना ७७ मतें मिळाली. ३ मते नोटाला मिळाली. विवेक रामटेके यांचा तिसऱ्यावेळी पराभवाचा वनवास संपल्याने वडसी गावात विजयी मिरवणूक काढण्यात आली.

हेही वाचा :

Back to top button