बारामती : पुढारी वृत्तसेवा : विकास सोसायटीच्या निवडणुकीचा वाद शमतो न शमतो तोपर्यंतच सायंबाचीवाडी (ता. बारामती) येथे सोमवारी (दि. ६) ग्रामपंचायत निवडणूक निकालानंतर धुमश्चक्री झाली. दोन गट एकमेकांना भिडले. त्यांनी एकमेकांवर दगडफेक केली. या घटनेत वाहनांच्या काचा फोडण्यात आल्या. या प्रकरणी वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.
सायंबाचीवाडी ग्रामपंचायत निवडणूकीत उद्योजक दुर्योधन भापकर यांच्या नेतृत्वाखालील श्री. स्वयंभू परिवर्तन पॅनेल व डी. पी. जगताप यांच्या नेतृत्वाखालील श्री. स्वयंभू हिराबाई माता ग्रामविकास पॅनेल यांच्यात लढत झाली. या पॅनेलचे पाच सदस्य निवडून आले आहेत. दुर्योधन भापकर यांच्या नेतृत्वाखालील श्री स्वयंभू परिवर्तन पॅनेलने दोन सदस्यांसह सरपंचपदाची जागा जिंकली.
अधिक जागा जिंकलेला श्री स्वयंभू हिराबाई माता ग्रामविकास पॅनेलचे कार्यकर्ते विजयानंतर देवदर्शनाला निघाले होते. येथील गावची यात्रा आहे, याचवेळी श्री स्वयंभू परिवर्तन पॅनेल यांचे कार्यकर्ते देवदर्शनाला आले. समोरासमोर आल्यानंतर सुरुवातीला बाचाबाची आणि त्यानंतर दगडफेक झाली. दोन्ही गट एकमेकांना भिडले. त्यामुळे गावच्या यात्रेतच तणावाची स्थिती निर्माण झाली. काही वाहनांचे या घटनेत काचा फुटून नुकसान झाल्याची माहिती मिळाली. वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन काळे व कर्मचाऱ्यांनी तात्काळ तेथे पोहोचत परिस्थिती नियंत्रणात आणली. दोन्ही गटांनी परस्पर विरोधी तक्रारी पोलिसांकडे दिल्या आहेत. गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.
हेही वाचा