सांगली : जत तालुक्यातील ग्रामपंचायतींमध्ये माजी आमदार विलासराव जगताप यांचा करिष्मा कायम | पुढारी

सांगली : जत तालुक्यातील ग्रामपंचायतींमध्ये माजी आमदार विलासराव जगताप यांचा करिष्मा कायम

जत; विजय रूपनूर : नुकत्याच पार पडलेल्या जत तालुक्यातील पाच ग्रामपंचायतीत भाजपने निर्विवाद वर्चस्व मिळवले आहे. माजी आमदार विलासराव जगताप यांनी करिष्मा कायम ठेवला आहे. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विद्यमान आमदार विक्रमसिंह सावंत यांना हा धक्का मानला जात आहे.बिळूर,काेंत्येबाेबलाद कोणबगी, गुलगुंजनाळ, खिलारवाडी या पाचही ग्रामपंचायत मध्ये भाजपने सरशी केली आहे या विजयामुळे भाजपचे मनोबल वाढले आहे तर काँग्रेसला आत्मचिंतनाची गरज आहे.

माजी आमदार विलासराव जगताप यांच्या होमपीच असलेल्या काेंत्येबाेबलादची सत्ता भाजपने एक हाती खेचून घेतली आहे. गत ग्रामपंचायतच्या निवडणुकीतील शंभर टक्के वचपा माजी आमदार जगताप समर्थकांनी काढला आहे. दक्षिण भागातील बिळूर व खिलारवाडी या दोन्ही ग्रामपंचायतीचा निकाल आगामी निवडणुकीमध्ये परिणामकारक असू शकतो. काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या बिळूर ग्रामपंचायत मध्ये गत दहा वर्षा पासून भाजपने सत्ता कायम ठेवली आहे. या राजकीय दृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या व मोठी असलेल्या बिळूर मध्ये ग्रामपंचायत मध्ये माजी आमदार विलासराव जगताप यांच्या नेतृत्वाखाली सत्ता अबाधित ठेवली आहे.

जत पूर्व भागातील तिन्ही ग्रामपंचायतने भाजपला कौल दिला आहे कोणबगी येथे जगताप गटांने सरशी केली आहे. गुलगुंजनाळ ग्रामपंचायत पुन्हा भाजपकडेच राहिली आहे. जरी ग्रामपंचायती पाच असल्या तरी जिल्हा परिषद गटातील आगामी निवडणुकीवर हा निकाल परिणाम करू शकतो. एकंदरीत या ग्रामपंचायतच्या निवडणुकीच्या निमित्ताने जनतेने भाजपला पसंती दिली आहे यामुळे भाजपचे मनोबल वाढले आहे. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व विद्यमान आमदार विक्रमसिंह सावंत यांना व काँग्रेसच्या विचारधाराला जनतेने नाकारले आहे. विद्यमान आमदार गटाने काेंत्येबाेबलाद येथे प्रयत्न करून ही यश मिळाले नाही . बिळूर ग्रामपंचायत मध्ये काँग्रेसने ताकद पणाला लावली होती परंतु या ठिकाणी काँग्रेसला आठ जागा मिळाल्या आहेत तर भाजपला नऊ जागा व सरपंच पद मिळाले आहे. इतर पक्षांना या निवडणुकीत म्हणावे तसे स्थान मिळाले नाही.

जत तालुका दुष्काळ दुष्काळी तालुका असतानाही अद्याप दुष्काळ जाहीर केला नाही याचा काही प्रमाणात आमदार सावंत यांना फटका बसलेला आहे अशी चर्चा जनतेतून येत आहे. तालुक्यातील अनेक प्रलंबित प्रश्नांचा खच आहे. आगामी निवडणुकीत पाणी प्रश्न ,शासनाकडून मिळत जाणारी दुजाभावाची वागणूक याची नाराजी दिसून येणार आहे. प्रलंबित प्रश्नांमुळे दोन्हीही पक्षांना आगामी निवडणुकीत किंमत मोजावी लागणार आहे.

विजयी सरपंच

काेंत्येबाेबलाद : राणी मुरलीधर जगताप विजयी सरपंच (एकहाती सत्ता भाजप)
बिळूर : विद्याश्री लक्ष्मण जखगोंड सरपंच भाजप
खिलारवाडी : द्रोपदी धुळा लोखंडे सरपंच भाजप
गुलगुंजनाळ : राणी दामाजी माने सरपंच भाजप
कोणबगी : सरस्वती अमोगसिद्ध बिरादार सरपंच भाजप

Back to top button