Buldhana| तेलंगणात दरोडा, देऊळगाव महीत सोने खरेदी !

Telangana police detain Deulgaon Mahi jeweller- सराफा व्यापाऱ्यास तेलंगणा पोलिसांनी उचलले, सराफा व्यापाऱ्यांत खळबळ
Crime News
Crime Newspudhari photo
Published on: 
Updated on: 

देऊळगाव राजा, पुढारी वृत्तसेवाः तेलंगणा राज्यातील दरोड्याच्या प्रकरणातील सोने खरेदी केल्याच्या संशयावरून देऊळगाव मही येथील एका सराफा व्यापाऱ्याला तेलंगणा पोलिसांनी देऊळगाव राजा येथे येउन ताब्यात घेतले. संबंधित व्यक्तींची ओळख सुरुवातीला स्पष्ट न झाल्याने शहरात सुरुवातील सराफा व्यापाऱ्याचे अपहरण झाल्याची चर्चा झाली. या घटनेची माहिती मिळताच साखरखेर्डा पोलिसांनी तातडीने नाकाबंदी करून गजरखेडजवळ संबंधित वाहन चार वाजता अडविले. त्यानंतर वाहनात तेलंगणा पोलिसांचे एलसीबीसीचे पथक सराफा व्यापाऱ्याला घेउन जात असल्याचे स्पष्ट झाले.

Crime News
Jalna water purification proposal | जालन्याच्या पाणीप्रश्नावर ७४.९ कोटींचा उतारा!

मिळालेल्या माहितीनुसार, सदर व्यापारी हे २ नोव्हेंबर रोजी त्यांच्या मामा सोबत जमिनीच्या व्यवहारानिमित्त देऊळगाव राजा येथील तहसील कार्यालय परिसरातील दुय्यम निबंधक कार्यालयात आले होते. दुपारी १ ते १.३० वाजताच्या सुमारास सोनेरी रंगाच्या इनोव्हा वाहनातून आलेल्या चार ते पाच व्यक्तींनी आपण एलसीबीचे अधिकारी असल्याचे सांगत सदर सराफा व्यापाऱ्याला वाहनात बसण्यास सांगितले. सुरुवातीला त्यांनी नकार दिला; मात्र त्यानंतर त्यांना वाहनात बसवून संबंधित वाहन शहराबाहेर निघून गेले.

Crime News
Jalna Crime| तीनपट परताव्याचे आमिष देऊन १ कोटी ३२ लाखांची फसवणूक, आरोपी जेरबंद

या प्रकारानंतर सराफा व्यापाऱ्याच्या मामाने देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात घटनेची माहिती दिली. काही वेळातच ही घटना परिसरात पसरली. सराफा व्यापाऱ्याचे नातेवाईक आणि मित्रमंडळी पोलीस ठाण्यात जमा झाले. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती दिली. जिल्हा पोलीस अधीक्षक नीलेश तांबे यांनी जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांना नाकाबंदी करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार विविध मार्गावर वाहनांची तपासणी आणि संबंधित वाहनाचा शोध सुरू करण्यात आला. शहरांतील सीसीटीव्ही फुटेजचीही तपासणी करण्यात आली.

दरम्यान, साखरखेर्डा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गजरखेडजवळ नाकाबंदी सुरू असताना ठाणेदार युवराज रबडे यांनी संशयित इनोव्हा वाहन चार वाजता अडवून चौकशी केली. यावेळी वाहनात तेलंगणा राज्यातील एलसीबीचे अधिकारी व कर्मचारी असल्याचे समोर आले. त्यानंतर संबंधित पथकाला साखरखेर्डा पोलीस ठाण्यात आणण्यात आले. ठाणेदार युवराज रबडे यांच्यासह जमादार CRIMSONE कडूबा डोईफोडे, लक्ष्मण इनामे आणि राजेश गीते यांनी या कारवाईत सहभाग घेतला.

प्राथमिक माहितीनुसार, तेलंगणा राज्यातील दरोड्याच्या गुन्ह्यातील सोने खरेदी केल्याच्या प्रकरणाचा तपास करताना तेलंगणा पोलिसांनी सदर सराफा व्यापाऱ्यावर कारवाई केली असुन त्यांना ताब्यात घेऊन अटक करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. सध्या साखरखेर्डा पोलीस ठाण्यात संबंधित प्रकरणाबाबत चौकशी सुरू असून उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष खाडे यांनीही घटनास्थळी लक्ष केंद्रित केले आहे.

पुढील तपासासाठी सदर सराफा व्यापाऱ्यास देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात आणण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली. तेलंगणातील दरोड्याचे नेमके स्वरूप, सोने खरेदीचा व्यवहार, अन्य व्यक्तींचा सहभाग याबाबत अधिकृत तपशील अद्याप समोर आलेला नाही.

सुरक्षा कडक करावी

देऊळगाव राजा येथे सध्या बालाजी यात्रा उत्सव सुरू असल्याने या घटनेची माहिती पसरताच शहरात अपहरण झाल्याची चर्चा सुरू झाली होती. मात्र, पुढील चौकशीत हा प्रकार तेलंगणा पोलिसांच्या कारवाईशी संबंधित असल्याचे स्पष्ट झाल्याने या चर्चेला वेगळे वळण मिळाले. यात्रा उत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरात भाविकांची मोठी गर्दी होत असल्याने पोलीस प्रशासनाने सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्याची गरज आहे. प्रमुख चौकांमध्ये पोलीस बंदोबस्त, संशयास्पद वाहनांची तपासणी आणि सीसीटीव्ही यंत्रणेवर बारकाईने लक्ष ठेवून भाविकांची सुरक्षितता व कायदा-सुव्यवस्था अबाधित राखणे अपेक्षित आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.