

जालना : शहरातील संभाव्य पाणीटंचाईवर मात करण्यासाठी आणि भविष्यात नागरिकांना नियमित व शाश्वत पाणीपुरवठा करण्याच्या दृष्टीने महानगरपालिकेने कंबर कसली आहे. तातडीच्या दुष्काळ निवारण उपाययोजनांसह दीर्घकालीन पाणीपुरवठा व पायाभूत सुविधांच्या विकासासाठी तब्बल ७४.९ कोटी रुपयांचा कृती आराखडा प्रस्तावित करण्यात आला आहे. यामध्ये समांतर जलवाहिनी, नवीन जलशुद्धीकरण केंद्रे, जलकुंभांची दुरुस्ती, पुरातन बारवांचे पुनरुज्जीवन, घाणेवाडी तलावाचे मजबुतीकरण आदी कामांचा समावेश आहे.
दरम्यान, जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी जिल्हा नियोजन समितीअंतर्गत अल्पसंख्याक आणि मागासवर्गीय योजनांसाठी उपलब्ध होणारा निधी केवळ बांधकामांवर खर्च न करता पाणी संवर्धनाच्या कामांसाठी वापरण्याच्या दृष्टीने प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच महानगरपालिकेने प्रस्तावित केलेल्या विविध कामांसाठी निधीची मागणी करणारा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्याचे आदेशही त्यांनी दिले आहेत.
संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेऊन शहरातील पारंपरिक जलस्रोतांचे पुनरुज्जीवन करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. विशेष दुष्काळ निवारण निधीतून शहरातील ११ पुरातन बारवांमधील गाळ काढून त्यांची स्वच्छता व दुरुस्ती केली जाणार आहे.
महाअभियानांतर्गत अपूर्ण घाणेवाडी साठवण तलावाचा सांडवा दुरुस्त करून मजबुतीकरण करण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला आहे. महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान पाणीपुरवठा योजनेची कामे पूर्ण करण्यासाठी एकूण २६.१५ कोटी रुपयांच्या निधीची मागणी करण्यात आली आहे. यामध्ये शासनाचा प्रलंबित हिस्सा ६.५२ कोटी, विशेष बाब म्हणून महानगरपालिकेसाठी १८.०८ कोटींचे अनुदान आणि स्वनिधीतून यंत्रणांना द्यावयाचे १.५५ कोटी रुपये समाविष्ट आहेत. दुसरीकडे, दैनंदिन पाणीपुरवठा आणि संभाव्य टंचाई निवारणाच्या कामांसाठी जिल्हा नियोजन समितीकडून ४८.७५ कोटी रुपयांचा निधी प्रस्तावित आहे.
शहरातील मलनिस्सारण प्रकल्प डिसेंबर २०२६ अखेरपर्यंत कार्यान्वित करण्याचे नियोजन आहे. अमृत १.० योजनेंतर्गत ५० एमएलडी क्षमतेच्या सांडपाणी प्रक्रिया केंद्राचे (एसटीपी) काम अंतिम टप्प्यात आहे. भूमिगत सांडपाणी व्यवस्थापनासाठी डीपीआर तयार करण्याची प्रक्रिया सुरू आहे. एकूणच, ७४.९ कोर्टीच्या कृती आराखड्याला शासनाची मंजुरी आणि निधी उपलब्ध झाल्यास जालना शहराच्या पाणीपुरवठ्याचा प्रश्न दीर्घकालीन दृष्टिकोनातून मार्गी लागण्याची अपेक्षा आहे.
समांतर जलवाहिनीने वाढत्या शहराला दिलासा
सन २०१३ मध्ये कार्यान्वित झालेली जालना शहराची पाणीपुरवठा योजना वाढती लोकसंख्या आणि विस्तारणारे शहर लक्षात घेता पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे जालना-जायकवाडी समांतर जलवाहिनीचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करून तांत्रिक मान्यतेसाठी पाठविण्यात आला आहे. तसेच महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियानांतर्गत अंबड येथे ३५ एमएलडी आणि जेईएस महाविद्यालयाजवळ १५ एमएलडी क्षमतेची नवीन जलशुद्धीकरण केंद्रे उभारण्याचे काम प्रगतिपथावर आहे. ही भविष्यात अपीना शहर पार दोन्ही केंद्रे कार्यान्वित झाल्यानंतर शहराला आवश्यक असलेला ५८ एमएलडी पाणीपुरवठा उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.