

जालना : बाबा ट्रेडिंग आणि एफएमसीजी कंपनीत गुंतवणूक केल्यास वर्षभरात गुंतवणुकीच्या तिप्पट रक्कम मिळेल, असे आमिष दाखवून शिक्षकासह ५० जणांची तब्बल १ कोटी ३२ लाख ५ हजार रुपयांची फसवणूक केल्याच्या आरोोतील मुख्य सूत्रधार मोहम्मद एजाज मोहम्मद रफिक सलाट याला आर्थिक गुन्हे शाखेने मुंबईतील बांद्रा येथून अटक केली आहे. न्यायालयाने आरोपीला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
जालना शहरातील शेरसवार नगर येथील शिक्षक मोहम्मद फेरोज अब्दुल सत्तार यांच्यासह त्यांचे भाऊ आणि अन्य ५० गुंतवणूकदारांना तिप्पट परताव्याचे आमिष दाखवून आरोपींनी मोठी रक्कम गुंतवणूक करून घेतली होती.
गुंतवणुकदारांनी मोठी गुंतवणुक केल्यानंतर आरोपी पसार झाले होते. या प्रकारामुळे गुतंवणुकदारांमधे प्रचंड खळबळ उडाली होती. याप्रकरणी ३ ऑक्टोबर रोजी कदीम जालना पोलीस ठाण्यात तीन जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर प्रकरणात पोलिसांनी यापूर्वी आरोपीच्या अटकेमुळे गुंतवणुकदारांना दिलासा मिळाला आहे.
वसीम अहमद अब्दुल गफार आणि मोहम्मद युनूस अहमद मोहम्मद सलीम या दोघांना ७ ऑक्टोबर रोजी अटक करण्यात आली होती. ते सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. ही कारवाई पोलिस अधीक्षक तेघबिरसिंह संधू यांच्या मार्गदर्शनाखाली आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली. या प्रकरणात आणखी गुंतवणूकदारांची फसवणूक झाल्याची शक्यता असून, संबंधितांनी आर्थिक गुन्हे शाखेशी संपर्क साधून तक्रार दाखल करावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
फरार होता आरोपी
मुख्य आरोपी एजाज सलाट गुन्हा दाखल झाल्यापासून फरार होता. तो मोबाईल वापरत नसल्याने पोलिसांना त्याचा शोध घेण्यात अडचणी येत होत्या. मात्र, गोपनीय माहितीच्या आधारे तो मुंबईतील बांद्रा येथे असल्याचे समजताच आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने निर्मलनगर पोलिसांच्या मदतीने रात्री एक वाजता त्याला अटक केली.